Friday, January 30, 2026

Ajit Pawar Passed Away : "परत या, परत या... अजितदादा परत या"; पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांचा आक्रोश

Ajit Pawar Passed Away :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून "परत या, परत या ... अजितदादा परत या", "थांबा! आमच्या दादांना नेऊ नका, आम्ही पाया पडतो" अशा शब्दांमध्ये आक्रोश सुरू आहे.  संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली आहे. सर्वांना आपले अश्रू थांबवून ठेवणं कठीण झालं आहे.
बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.
राजकारणातील आक्रमक चेहरा ते सामान्यांचा 'हक्काचा दादा' असा अजित पवार (Ajit Pawar) यांचा प्रवास एका वळणावर येऊन थांबला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीत आणि प्रतिमेत केलेला बदल हा राज्यासाठी कौतुकाचा विषय ठरला होता. केवळ सत्तेचे राजकारण न करता, लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज त्यांच्या आठवणींना अधिक गडद करत आहे. अजित पवार यांनी अलीकडच्या काळात महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले होते. या नव्या नात्याचे प्रतीक म्हणून त्यांनी स्वीकारलेला 'गुलाबी रंग' हा केवळ कपड्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या मृदू आणि सर्वसमावेशक प्रतिमेचा भाग बनला होता. राजकीय डावपेचांपलीकडे जाऊन त्यांनी स्वीकारलेली ही नवीन 'इमेज' आज त्यांच्या निधनानंतर समर्थकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. रणनीती बदलून जनतेच्या अधिक जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आपल्या लाडक्या नेत्याची ही 'गुलाबी स्वप्नं' आणि विकासाची धडाडी आता केवळ आठवणींच्या रूपात जनतेच्या मनात जिवंत राहणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >