मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची (एडीआर) नोंद करण्यात आली असून, त्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने एडीआर दाखल करून तपासाची दिशा निश्चित केली आहे. या अपघातामागील नेमकी कारणे काय होती, विमान कोसळण्यापूर्वी नेमके काय घडले, तसेच दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा सखोल आणि सर्वंकष तपास केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाकडून तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी नागरी उड्डाण महासंचालनालय (डिजीसीए) आणि इतर संबंधित तपास यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताच्या कारणांबाबत स्पष्ट माहिती समोर येईल, असे पोलीस सूत्रांनी नमूद केले आहे.






