महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी सर्वात अगोदर माझ्याकडे आली होती, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राजेश टोपे पुढे म्हणाले की; "आमच्या जिल्ह्यातील एक मुलगा बारामती विमानतळावर स्टोअर रुममध्ये कामाला आहे. त्याने मला सकाळी फोन करुन अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितले. फक्त विमानाचे शेवटचे टोक दिसत आहे बाकी सर्व विमान जळून गेले असेही त्याने यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परखड, स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा आणि रोखठोक भूमिका मांडणारे एक धडाडीचे नेतृत्व आपल्यातून हरपले. त्यांचे आणि आमचे पारिवारिक संबंध असल्याने त्यांचे अचानक जाणे आमच्या… pic.twitter.com/2khPshFhXm
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 28, 2026
बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.
‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना :
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बारामतीत उपस्थित राहणार आहेत. २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुंटुंबानी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सकाळी गदिमा सभागृहापासून दादांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्याप्रतिष्ठानचा आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येणार आहे.






