बारामतीच्या 'वाघा'ला निरोप देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. बारामतीचा कायापालट पाहण्यासाठी याआधी अनेकदा उत्साहात आलेले अमित शहा आज मात्र अत्यंत जड अंतःकरणाने बारामतीत दाखल झाले. अजित पवार हे केवळ राज्याचे नेते नव्हते, तर सहकार क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान आणि थेट संवाद साधण्याची हातोटी ही राष्ट्रीय पातळीवरही कौतुकाचा विषय होती. अमित शहा यांनी यावेळी पवार कुटुंबाचे सांत्वन केले आणि अजित पवारांच्या 'शब्द पाळण्याच्या' वृत्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
View this post on Instagram
निर्णयक्षम नेतृत्वाचा अंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, "महाराष्ट्र आज एका धाडसी आणि अत्यंत निर्णयक्षम नेत्याला मुकला आहे." प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि विकासाची धडाडी यामुळे त्यांनी केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला होता.
प्रशासकीय आणि जनसामान्यांची गर्दी
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सकाळपासूनच सामान्य जनतेने आपल्या लाडक्या 'दादां'ना निरोप देण्यासाठी रांगा लावल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील अश्रू दादांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होते. राज्यभरातील आमदार, खासदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सध्या बारामतीत उपस्थित असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






