आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला...
मुंबई - आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला आहे. त्यांचे आकस्मिक निधन हे धक्कादायक आणि मन पिळवटून टाकणारे आहे. त्यांच्या निधनाने एक कुशल प्रशासक, अभ्यासू, रोखठोक आणि सदैव ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
गेली अनेक वर्षे दादांसोबत काम केले असून ज्या-ज्या वेळी आमची भेट झाली, त्या प्रत्येक वेळी दादा हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहूनच काम केले पाहिजे, यावर भर द्यायचे. महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, ही त्यांची कायमची आग्रही भूमिका होती. शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ आणि संवेदनशीलता मी अगदी जवळून अनुभवली आहे असेही सुनिल तटकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
माझ्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात अजितदादांचे मार्गदर्शन, विश्वास आणि पाठबळ मला सदैव लाभले. कठीण निर्णयांच्या प्रसंगी त्यांची स्पष्ट व ठाम भूमिका, प्रशासनावरची मजबूत पकड आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आम्हा सर्वांसाठी नेहमीच दिशादर्शक ठरली. त्यांच्या नेतृत्वशैलीतून अनेक कार्यकर्ते घडले असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.
आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला आहे. अजितदादांचे असे आकस्मिक जाणे ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मात्र त्यांचे विचार, कार्य आणि सर्वसामान्य जनतेसाठीचे अमूल्य योगदान सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
या दुःखाच्या क्षणी पवार कुटुंबियांच्या शोकात सहभागी आहे. ईश्वर पवार कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करत सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.