भात केंद्रावर गोण्या उतरवण्यास नकार
गोऱ्हे खरेदी केंद्रावर धान खरेदी रखडली
वाडा : एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यातील धान खरेदी केंद्र नावापुरतीच उरली आहेत. गेल्या वर्षीची हमाली अद्याप न मिळाल्याने हमालांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. परिणामी, १० जानेवारी रोजी थाटामाटात उद्घाटन होऊनही १७ दिवस उलटले तरी 'गोऱ्हे' केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
वाडा तालुक्यात गुहीर, कळंभे, गोऱ्हे, पोशेरी, परळी, सारशी, कुडूस, कोनसई आणि मानिवली अशा नऊ केंद्रांवर धान खरेदी केली जाते. या सर्व केंद्रांवर काम करणाऱ्या हमालांची गेल्या वर्षीची लाखोंची रक्कम महामंडळाने थकवली आहे. गोऱ्हे केंद्रावरील १० हमालांनी या अन्यायाविरोधात आक्रमक पवित्रा घेत, जोपर्यंत जुनी मजुरी मिळत नाही, तोपर्यंत गाड्यांमधून भात उतरवणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.हमालांच्या संपामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. शेतकरी मोठ्या आशेने केंद्रावर भात घेऊन येतात, मात्र कामगार नसल्याचे कारण सांगून त्यांना परत पाठवले जाते. मजुरी, वाहतूक खर्च आणि वेळ वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी राजेश पवार यांनी सांगितले की, "हमालीचा दर प्रति क्विंटल ११.७५ रुपये असून केंद्र सरकारकडून ५० टक्के निधी येणे बाकी आहे. सुमारे २५ लाख रुपयांची थकबाकी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र, महामंडळाकडे असलेल्या 'अग्रिम' निधीतून येत्या दोन-तीन दिवसांत हमालांचे पैसे देण्याचे नियोजन सुरू आहे." मुंबईत या संदर्भात महत्त्वाची बुधवारी बैठक पार पडणार असून, त्यानंतर हमालांच्या खात्यावर पैसे जमा होतात का आणि रखडलेली धान खरेदी पुन्हा सुरू होते का? याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष दिले पाहीजे कारण जे शासन हमालांचे रोजंदारीचे पैसे एक वर्ष पूर्ण झाले तरी देऊ शकले नाही. ते शेतकऱ्यांची भात खरेदी कशी करणार, म्हणून च मोठ्या थाटा माटात भात खरेदी केंद्रांची उद्घाटने झाली. मात्र प्रत्यक्षात भात खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. - अनिल पाटील, कृषी रत्न शेतकरी.






