पुणे : तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अजित पवारांचे बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. या निधनावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आणि अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला. अखेर ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूवरून राजकारण करणाऱ्यांना सुनावले.
अजित पवारांचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड दुःख झाले आहे. हा मोठा धक्का आहे. यातून सावरण्यास वेळ मिळावा म्हणून प्रसारमाध्यमांसमोर येणार नव्हतो. पण अजित पवारांच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झाल्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देत असल्याचे शरद पवारांनी सांगितले. जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हा घातपात नाही, अपघात आहे; असे शरद पवार म्हणाले. अजित पवारांच्या मृत्यूवरून कोणीही राजकारण करू नये, असेही शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला आहे. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही, पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी प्रसारमाध्यमांसमोर येणार नव्हतो.पण काही माध्यमांमध्ये या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया यात राजकारण आणू नये, एवढंच सांगायचं आहे; असे शरद पवार म्हणाले.
बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे. मुंबईतून निघालेले विमान बारामतीत आले आणि लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला. विमानात असलेल्या अजित पवारांसह एकूण पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली.






