Tuesday, January 27, 2026

संत नामदेव

संत नामदेव

देव दाखवी ऐसा नाही गुरु देव दाखवी ऐसा नाही गुरु। जेथे जाय तेथे दगड शेंदरू॥ देव दगडाचा बोलेल कैचा। कोण काळी त्यास फुटेल वाचा॥ देव देव करिता शिणले माझे मन। जेथे जाय तेथे पूजा पाषाण॥ नामा तोचि देव हृदयी पाहे। नामा, केशवाचे न सोडी पाये॥

- डॉ. देवीदास पोटे

संत नामदेव हे विठ्ठलाचे प्रेमभंडारी म्हणजे लडिवाळ भक्त. ‘नाम’ हाच त्यांचा देव होता. आयुष्यभर ते हरिनामाच्या रंगात रंगून गेले होते. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ अशी प्रतिज्ञा करुन त्यांनी भारतभ्रमण केले आणि भागवत धर्माची धर्मपताका उत्तरेपर्यंत नेली. ‘नामे नारायण नाही भेद’ हे विचारांचे सूत्र घेऊन त्यांनी माणसाच्या जीवनाला आनंदाचे परिणाम दिले. विविध ठिकाणी विखुरलेल्या आणि मनाने विस्कटलेल्या समाजाला त्यांनी भक्तिमार्गाचे तत्त्व प्रतिपादन केले. माणसा माणसातले ऐक्य, बंधूभाव जोपासत त्यांनी राष्ट्रीय एकताही साध्य केली.

या अभंगात ते म्हणतात, ‘‘आपल्याला देव दाखवणारा गुरू मिळणार नाही. जिकडे जाऊ तिकडे शेंदूर फासलेला दगड आढळेल. या दगडाचा देव कसा काय बोलणार? त्याला कधी वाचा फुटणे शक्य आहे का? देवाचा शोध घेता घेता मन पार थकून गेले. जिकडे पाहावे तिकडे पाषाणाची पूजा चालते. मी देवाला माझ्या हृदयात पाहातो आणि केशवाच्या चरणावर मस्तक ठेवतो.’’ संत नामदेवांनी नामाच्या भक्तीने देवालाही प्रेमाचा लळा लावला. नामदेव म्हणजे भक्तीची सजीव मूर्ती.

आजच्या वर्तमान काळातही लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. ते दगडाच्या देवावर विसंबून राहतात. उपास करतात. नवस बोलतात. लोकांना योग्य-अयोग्य समजेनासे झाले आहे. मग ते कुठल्यातरी बाबा, स्वामी, महाराज यांच्या नादी लागतात नि अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. देव ही दाखवण्याची वस्तू नाही. देव ज्याने त्याने प्राप्त करायचा असतो. खरा गुरू शिष्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. देवाचे खरे स्वरुप ओळखा असे संतांनी आपल्याला सांगितले आहे. भक्तीची वाट चालताना सगुणाकडून निर्गुणाकडे गेले पाहिजे. देवाला इकडे तिकडे न शोधता आपल्या अंतरंगातील देव शोधला पाहिजे. म्हणूनच देव हृदयी पाहे, केशवाचे न सोडी पाये असा स्पष्ट संदेश संत नामदेवांनी दिला आहे.

Comments
Add Comment