ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात अजित पवार यांचे सुरक्षारक्षक पोलीस हवालदार (पर्सनल सेक्युरिटी ऑफीसर, पीएसओ) विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे. राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच मंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती दौरा होता. याच दौऱ्यामध्ये मुंबई पोलीस दलातील हवालदार जाधव यांचीही त्यांच्यासमवेत पीएसओ म्हणून डयूटी होती. बुधवारी सकाळी ८.१० चे विमानाचे मुंबईतून टेक ऑफ असल्यामुळे जाधव यांना मुंबईत ५.३० वाजता पोहोचायचे होते. ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी मंगळवारी खारीगाव येथील त्यांच्या सासूरवाडीमध्ये गेले होते. तिथूनच ते बुधवारी पहाटे ४ वाजता डयूटीसाठी रवाना झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचीच माहिती समजताच जाधव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. जाधव हे विटावा येथील सूर्यानगर परिसरातील साई कृष्ण विहार इमारतीच्या बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरड गावचे ते रहिवासी होते. विदीप यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.






