बारामती : संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात, अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राजकारणातील एक 'व्हिजनरी' आणि स्पष्टवक्ता नेता हरपल्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या भीषण अपघातात अजित दादांसोबतच त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, दोन अनुभवी पायलट आणि एका महिला क्रू मेंबरचा समावेश होता. या दुर्घटनेत मृत्यू झालेली तरुण क्रू मेंबर पिंकी माळी हिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पिंकीच्या कुटुंबीयांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या लेकीच्या शेवटच्या आठवणींना उजाळा दिला. एका उमद्या नेतृत्वाच्या आणि तरुण जीवांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार ...
वडिलांशी बोलणं करून देण्याचं स्वप्न अधुरंच
बारामती येथील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वरळीतील बी.डी.डी. चाळीतील एका उमद्या तरुणीचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानात फ्लाईट अटेंडन्ट म्हणून कार्यरत असलेल्या कर्तु शिवकुमार माळी (पिंकी) या तरुणीचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. या बातमीने संपूर्ण वरळी परिसरावर शोककळा पसरली आहे. पिंकी दररोज आपल्या कुटुंबाशी न चुकता संवाद साधत असे. मात्र, आज जेव्हा तिच्या फोनवरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हाच माळी कुटुंबाच्या मनात पाल चुकचुकली होती. दुर्दैवाने, त्यांची ही भीती काही वेळातच सत्यात उतरली. पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वीच पिंकी वडिलांचे बोलणे अजित पवारांशी करून देणार होती, मात्र तांत्रिक कारणामुळे ते होऊ शकले नाही. "आजच्या प्रवासात दादांशी तुमचं नक्की बोलणं करून देईन," असा शब्द तिने वडिलांना दिला होता. मात्र, काळाने घाला घातला आणि वडिलांची आपल्या लाडक्या नेत्याशी बोलण्याची आणि लेकीला पाहण्याची इच्छा कायमची अधुरी राहिली. मुंबईच्या बी.डी.डी. चाळीतील एका सामान्य कुटुंबातील मुलीचा असा अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विदीप जाधव यांच्या निधनाने कुटुंबासह शेजारीही सुन्न
दादांचे सावलीसारखे सोबती आणि त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. सकाळी आनंदाने कामावर गेलेल्या विदीप यांच्या मृत्यूची बातमी धडकताच ठाणे-कलवा परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळीच चाळीतील शेजाऱ्यांनी विदीप यांना नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाताना पाहिले होते. मात्र, टीव्हीवर अपघाताची बातमी येताच त्यांच्या आईने हंबरडा फोडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कळवा पोलिसांनी तातडीने जाधव यांच्या घरी धाव घेतली आणि त्यांच्या आई व मुलाला बारामतीकडे नेले. विदीप यांची पत्नी कालच माहेरी गेली होती, या दुर्दैवी बातमीने संपूर्ण कुटुंब विखुरले गेले आहे. विदीप जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. पोलीस दलात असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत मदतीचा आणि मनमिळाऊ होता. "आमचा हसता-खेळता शेजारी गेला," अशा भावना व्यक्त करत, शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.





