इंजिनीअर दीप्तीची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे राहणाऱ्या दीप्ती मगर-चौधरी (वय २७) या पेशाने इंजिनीअर असलेल्या विवाहितेने २५ जानेवारी रोजी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीसमोर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
दीप्ती व रोहन चौधरी यांचा विवाह २०१९ मध्ये पार पडला होता. लग्नावेळी माहेरकडून ५० तोळे सोने देण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेल्यावर दीप्तीच्या आयुष्यात छळ, संशय व अपमानाची मालिका सुरू झाली. पती रोहन चौधरी याचा एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचे कारण पुढे करत दीप्तीकडे माहेरून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. मुलीचा संसार वाचावा म्हणून दीप्तीच्या आई-वडिलांनी १० लाख रुपये रोख दिले. यावरही समाधान न झाल्याने, चारचाकी गाडी घेण्यासाठी पुन्हा २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर माहेरकडून ३५ लाख रुपये देण्यात आले. लग्नात दिलेले सुमारे ५० तोळे सोने चोरीची भीती दाखवून सासू आणि पतीने दीप्तीकडून काढून घेतल्याचा आरोप आहे. नंतर विचारणा केल्यावर हे सोने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचे तिला सांगण्यात आले.
पती व सासून ३० तारखेपर्यंत कोठडी
सततचा छळ, अपमान, संशय, पैशांची मागणी आणि जबरदस्तीचा गर्भपात… या सगळ्याला कंटाळून २५ जानेवारीच्या रात्री दीप्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. दीप्तीची आई हेमलता मगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सरपंच सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती आणि सासूला अटक करण्यात आली असून, त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासरे आणि दीर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
‘वंशाला दिवा हवा’ असा विकृत हट्ट : दीप्तीला पहिली मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्याने सासरच्यांची नाराजी वाढली. नोव्हेंबर २०२५ मध्ये दीप्ती पुन्हा गर्भवती होती. पाच महिन्यांची गरोदर असताना सासरच्यांनी तिच्यावर जबरदस्तीने गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी दबाव टाकला. पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, दीप्तीचा विरोध डावलून तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.






