राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बारामतीकडे जात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारसोबत माझे बोलणे झाले आहे. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. महाराष्ट्राकरिता आजचा दिवस हा अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते. माझा दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला. "
🕛 11.53am | 28-1-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/RuZqmWtpAS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 28, 2026
अशा प्रकारचं नेतृत्व तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात :
पुढे बोलतांना ते म्हणाले की; "अजितदादा महाराष्ट्राची जाण असलेला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले नेते होते. त्यांच्याबद्दल जनतेत मोठी आस्था होती. ते संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. अशा प्रकारचं नेतृत्व तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात." अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रूग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश केला असून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सध्या बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताची सविस्तर चाैकशी ही केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे.






