Wednesday, January 28, 2026

Ajit Pawar : "उद्ध्वस्त"...दिल्लीतून बारामतीकडे निघताना सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट; 'दादा'...

Ajit Pawar :

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी 'दादां'नी जगाचा निरोप घेतल्याने राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या भगिनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या भावाच्या जाण्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या असून, त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. त्यांचे हे स्टेटस सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ते पाहून कार्यकर्त्यांच्याही डोळ्यांत पाणी येत आहे.

ज्या बारामतीने दिले 'बळ', तिथेच 'दादां'चा शेवटचा श्वास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रवास आज सकाळी सव्वानऊ वाजता बारामतीच्याच मातीत कायमचा थांबला. ज्या बारामतीला त्यांनी आपल्या हयातीत आधुनिकतेचे रूप दिले, त्याच ठिकाणी लँडिंग दरम्यान झालेल्या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आज सकाळी ९:१५ च्या सुमारास अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर उतरणार होते. मात्र, लँडिंगच्या अगदी काही क्षण आधी विमानाला भीषण अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. या भीषण आगीत अजित पवारांसह विमानातील सर्व पाच सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. ४४ वर्षांच्या धडाकेबाज राजकीय प्रवासाचा असा दुर्दैवी अंत होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. अजित पवार आणि बारामती हे नाते रक्तापेक्षाही घट्ट होते. त्यांच्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वाचे पैलू होते. महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल आठ वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर होता. अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरी सांभाळतानाच त्यांनी ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांना शिस्त लावून दिली. "दादांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे" ही त्यांच्या समर्थकांची आणि स्वतः अजित पवारांची मनातील सुप्त उर्मी मात्र आज या अपघातामुळे कायमची अधुरी राहिली.

'डिवास्टेटेड'... सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया...

राजकारण आणि पक्षातील फुटीनंतरही कौटुंबिक स्नेह जपणारे 'दादा' अचानक सोडून गेल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर 'डिवास्टेटेड' (Devastated) म्हणजेच 'सर्वस्व उद्ध्वस्त झाले', असा एकच शब्द वापरला आहे. या एका शब्दातून आपल्या लाडक्या भावाच्या निधनाचे दुःख किती अथांग आहे, हे त्यांनी मांडले आहे. गेल्या काही काळापासून पवार कुटुंबात पुन्हा एकदा एकोपा निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. जय पवार यांच्या विवाहापासून ते नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांपर्यंत दोन्ही गट एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवार यांच्यासोबत अजितदादा हे कुटुंबातील एक प्रमुख कर्ते पुरुष म्हणून भूमिका बजावत होते. आज हा आधारस्तंभ निखळल्याने कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अपघाताची बातमी समजली तेव्हा संपूर्ण कुटुंब दिल्लीत होते. सुनेत्रा पवार (अजित पवारांच्या पत्नी), सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त दिल्लीत होते. त्यांच्यासोबत अजितदादांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार देखील राजधानीत होते. बातमी मिळताच हे सर्वजण विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीत असलेल्या पवार कुटुंबातील तरुण पिढीलाही मोठा धक्का बसला आहे. युगेंद्र पवार यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे, तर आमदार रोहित पवार यांच्याही अश्रूंचा बांध फुटला आहे. राजकीय मतभेद विसरून संपूर्ण कुटुंब आपल्या 'दादां'च्या शेवटच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले आहे.

Comments
Add Comment