पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार
मुंबई : विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवार २९ जानेवारी रोजी, बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असून, अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थितीही अपेक्षित आहे.
अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामती येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सकाळी सुमारे १० वाजता अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून राजकीय शोक जाहीर करण्यात आला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.
अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, उद्या ते स्वतः बारामतीत येऊन पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देशातील अन्य महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे.
आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने बारामतीकडे रवाना झाले आहेत. यामुळे बारामतीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, संपूर्ण शहरात शोकाकुल वातावरण आहे.






