अन्य पाचही जागांवर थेट लढती; वाटाघाटीनंतर माघार
जदसेचा भाजप-राष्ट्रवादी युतीला जाहिर पाठिंबा
पोलादपूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या चार गणांमध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या लोहारे गटात चौरंगी लढत होणार असून कापडे बुद्रुक गटासह पंचायत समितीच्या चारही गणांमध्ये थेट लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कापडे बुद्रुक ५८ जि.प.नामाप्र गटामध्ये डॉ. नीलेश कुंभार (शिवसेना), अजय सलागरे (राष्ट्रवादी-भाजप) अशी थेट लढत होणार आहे, तर लोहारे ५९ जि.प. सर्वसाधारण गटामध्ये चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (भाजप), अ. रझाक करबेलकर (काँग्रेस), कृष्णा कदम (अपक्ष) अशा ४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
पोलादपूर पंचायत समितीच्या माटवण ११५ नामाप्र महिला पंचायत समिती गणामध्ये शेकापतर्फे साक्षी कांबळेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे हर्षदा वरवाटकर अशी थेट लढत होणार आहे. कापडे बुद्रुक ११६ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिल दळवी विरूध्द राष्ट्रवादीचे अनिल मालुसरे अशी थेट लढत होणार आहे. लोहारे ११७ सर्वसाधारण महिला गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिता भिलारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युगज्ञा उतेकर अशी थेट लढत होणार आहे. कोतवाल बुद्रुक ११८ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अविनाश शिंदे विरुद्ध भाजपतर्फे सुरेंद्र चव्हाण, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना जनता दल सेक्युलरचे उमेदवार भगवान साळवी यांनी पक्षाला केंद्रसरकारमध्ये मंत्रीपद असल्यामुळे पाठिंबा जाहीर केला.






