Wednesday, January 28, 2026

अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरू

अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरू

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या भीषण दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अधिकृत चौकशी सुरू केली आहे. अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणांमुळे झाला, याचा सखोल तपास करण्यासाठी डिजीसीए आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) यांची संयुक्त चौकशी सुरू असून, घटनास्थळी तज्ज्ञांची पथके दाखल झाली आहेत.

डिजीसीएचे प्रमुख फैझ अहमद किडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी ८.४० ते ८.५० वाजताच्या दरम्यान घडला. अपघातानंतर तातडीने डिजीसीए आणि 'एएआयबी'ची पथके घटनास्थळी पोहोचली असून, विमानाच्या अवशेषांचे बारकाईने विश्लेषण करण्यात येत आहे. तसेच या अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.

या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल पुढील काही दिवसांत येण्याची शक्यता असून, अंतिम अहवाल नियमानुसार सहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करण्यात येईल, असे डिजीसीएने स्पष्ट केले आहे. तपासादरम्यान गरज भासल्यास विमान निर्माता कंपनी बम्बार्डिअर तसेच इंजिन तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. या विमानात दोन प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते आणि या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याचे डिजीसीएने स्पष्ट केले आहे. नेमकी कशाची चौकशी होणार ?

चौकशीदरम्यान विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तपासण्यात येणार आहेत. यासोबतच विमानाची मेंटेनन्स नोंद, तांत्रिक स्थिती आणि पूर्व इतिहास, अपघातावेळी असलेली हवामान परिस्थिती, पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवाद, लँडिंग अप्रोच तसेच विमानाच्या इंजिन, कंट्रोल सिस्टीम आणि लँडिंग गियरमधील संभाव्य तांत्रिक बिघाड या सर्व बाबींवर चौकशीत विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा