संजय गांधी उद्यानातील दुहेरी बोगद्याच्या पर्यायी कामांसाठी वाढला एक हजार कोटींचा खर्च
मुंबई : गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अर्थात जीएमएलआर प्रकल्पाचे काम महापालिकेच्यावतीने सुरु असून या प्रकल्पाचा खर्च आणखी विविध करांसह सुमारे एक हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित प्री-कास्ट डेक स्लॅब व्यवस्थेसह सुधारित बोगदा रेखांकन बदलामुळे हा खर्च वाढला गेला आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्प हा महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे . या जीएमएलआर प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.२ कि.मी. एवढी आहे. त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखाली प्रस्तावित भूमिगत दुहेरी बोगद्या बांधला जाणार आहे . या बोगद्याची लांबी ५.३ कि.मी. आहे आणि बोगद्या बाहेरील गोरेगाव फिल्मसिटी मधील प्रस्तावित कट आणि कव्हर पेटी बोगद्याची पोहोच रस्त्यासह लांबी १.३२ कि.मी. एवढी आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरातील नागरिकांना वाहतूक कोंडी पासून मुक्त होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
या प्रकल्प कामांसाठी महापालिकेने सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटदराची नेमणूक करून या कामाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पांच्या कामासाठी जे. कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. अँड नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (संयुक्त भागीदार) यांची नेमणूक केली असून विविध करांसह १३,८९१.१२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प येत्या नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे . सध्या या प्रकल्पाचे १७ ते २० टक्के एवढे काम पूर्ण झाले. परंतु आता याचा खर्च विविध करांसह ९३४.१२ कोटी रुपयांनी वाढून एकूण प्रकल्प खर्च विविध करांसह १४,८६५.२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोगदा रेखांकन करण्यापेक्षा प्री-कास्ट डेक स्लॅब व्यवस्थेसह सुधारित बोगदा रेखांकन केल्यामुळे रस्त्याखाली रिक्त जागा निर्माण होईल .जी प्रकल्पासाठी एकूणच फायदेशीर आहे. तसेच व त्यामुळे रस्त्याखालील जागेचा प्रभावी वापर होईल व सुधारित कार्यपद्धतीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल . कास्टींग यार्डमधील नियंत्रित कामांमुळे प्री कास्ट सेंगमेंट्सची गुणवत्ता जागेवर काँक्रिटीकरण करण्यापेक्षा चांगली राहील. तसेच संभाव्य अपघात सुटकेचा मार्ग म्हणूनही रस्त्याच्या खालील उपलब्ध होणाऱ्या जागेचा वापर केला जावू शकतो.






