Wednesday, January 28, 2026

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशा मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंतरिम प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) निविदा मागविल्या होत्या. या निविदेला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या निविदांची छाननी करून अंतरिम सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सल्लागारावर मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठीचा निविदा दस्तऐवज तयार करण्यासह इतर जबाबदाऱ्या असणार आहेत.

मेट्रो-११ या मार्गिकेसाठी २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपये असा खर्च येणार आहे. या मार्गिकेतील कारशेड आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील १६ हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आले आहे. एमएमआरसीने मार्गिकेच्या संरेखनात बदल करून नव्याने संरेखन निश्चित केले. त्यानंतर आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया अशा १७.५१ किमी लांबीची मेट्रो ११ मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला. या मार्गिकेसंदर्भातील पर्यावरण आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यासही केला. संरेखन, सामाजिक आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा अहवाल प्रसिद्ध करून त्यावर सूचना-हरकती मागवल्या. त्यानुसार एमएमआरसीकडे आलेल्या सूचना-हरकतींवर सुनावणीही घेतली. त्यानंतर या मार्गिकेचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला. राज्य सरकारने या मार्गिकेस मान्यता दिल्यानंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून बरेच दिवस उलटून गेले तरी या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही.

मेट्रो-११ मार्गिकेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असतानाच एमएमआरसीने या प्रकल्पासाठी अंतरिम सल्लागाराची नियुक्ती करत बांधकाम निविदेसाठीचे दस्तऐवज तयार करण्यासह बांधकामादरम्यानचे वाहतूक व्यवस्थापन, पुनर्वसन यासंबंधीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यासाठी निविदा मागविल्या. नुकत्याच या निविदा खुल्या करण्यात आल्या असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. सिस्ट्रा एमव्हीए कन्सल्टिंग, पॅडेको आणि ओरिएंटल कन्सल्टंट्स ग्लोबल यांच्या या निविदा आहेत. आता या निविदांची छाननी करून अंतरिम सल्लागाराची नियुक्ती केली जाईल. मार्गिकेस केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर या मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे

Comments
Add Comment