राजकीय वर्तुळातून आज अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे.
आज सकाळी बारामतीत एका शेतात हे विमान कोसळलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामतीमध्ये एक सभा होती. अजित पवार हे मुंबईहून बारामतीला येत होते अशी प्राथमिक माहिती आहे. त्यावेळी लँडिंग दरम्यान या विमानाला अपघात झाला. अजित पवार यांच्यासोबत विमानात अजून कोण-कोण होते हे समजू शकलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, हे देखील समजू शकलेले नाही.
अजित पवारांना घेऊन जाणारे विमान कोसळले, विमानातील सर्वांचा मृत्यू . .#prahaarnewsline #MarathiNews #ajitpawar #BaramatiNews #airoplane pic.twitter.com/vpYeWj2CZd
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) January 28, 2026
बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. तसेच या अपघातात विमानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.






