महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज बुधवार २८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारसोबत माझे बोलणे झाले आहे. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. महाराष्ट्राकरिता आजचा दिवस हा अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते. माझा दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला. "
असा झाला अपघात :
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. "पहिल्यांदा ते विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला." असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल होणार होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री गंभीर जखमी असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही वेळातच DGCA कडून अधिकृत दुजोरा मिळाला की, अपघात इतका भीषण होता की विमानातील सहाही जणांनी आपले प्राण गमावले आहेत.






