ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत, "आनंद दिघेंचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचे कार्य आपण पूर्ण करत आहोत," असे ठामपणे सांगितले.
या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी समाजोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले जातात. समाजकारण आणि लोकहित हेच त्यांच्या विचारांचे केंद्र होते. त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने ठाणे महापालिकेवर कर्मवीरांनी लावलेला भगवा यंदा अधिक तेजाने फडकत असून, यापूर्वीचे सर्व विजयाचे विक्रम या निवडणुकीत मोडीत काढले गेले आहेत.
ते पुढे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राखण्याचे काम आपण केले आहे. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांवरही भगवा झेंडा फडकला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत शिवसेना पुढे जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला, यामुळे पक्षाची ताकद राज्यभर वाढताना दिसत आहे.
"काही लोक म्हणत होते की शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण आज शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे," असे सांगत त्यांनी विजयाची गोडी पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
शिंदे यांनी शिवसेनेचा मूलमंत्र स्पष्ट करत सांगितले की, "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण" हा गुरुमंत्र घेऊन पक्ष वाटचाल करत आहे. "आपत्तीत शिवसेना, संकटात शिवसेना" हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे. अनेक कुटुंबांनी या योजनेच्या मदतीने छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. दुर्गम भागातील एका गरीब कुटुंबाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मदतीतून त्या कुटुंबाने तेल, मीठ, मसाला घेऊन घर चालवले असून त्यांना मोठा आधार मिळाला आहे.
याशिवाय लखपती योजना, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या योजना आणि महिला बचत गटांना मदत अशा अनेक लोककल्याणकारी योजना सरकारने राबवल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न आनंद दिघे साहेबांनी नेहमी पाहिले होते आणि त्याच मार्गावर आपण चालत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या वाढीमागे आनंद दिघे यांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण आणि जनतेचे प्रेम व पाठिंबा हीच खरी प्रेरणा आणि ऊर्जा आहे. ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






