मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील तोडक कारवाईविरोधात गेल्या दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू होते. मात्र, जनभावना लक्षात घेऊन या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नॅशनल पार्क परिसरात आदिवासी आणि वनविभाग यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष सुरू होता. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादही झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, आंदोनकांनी माघार घेतली.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – गणेश नाईक
मंत्रालयातील बैठकीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “नॅशनल पॉर्कमध्ये अतिक्रमणाची कारवाई न्यायालयाच्या आदेशान्वये सुरू होती. मात्र, विषयांचे गांभीर्य लक्षात घेता, कारवाई स्थगित करण्यात आली आहे. आता याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल. वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना हा विषय समजून घेण्याची सूचना केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत आदिवासी बांधवांची समजूत काढली जाईल आणि या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढला जाईल. मात्र, काही लोकांनी जी दगडफेक केली, ती उचित नाही. सरकार आमदार किंवा मंत्र्यांचे नाही, जनतेचे आहे. त्यामुळे जनतेने संयम बाळगला पाहिजे”, असे आवाहन देखील नाईक यांनी केले.