मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते न्यायालय आणि म्हाडा कार्यालय याठिकाणी जाण्यासाठी आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम केले असून याचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगरआदी मान्यवर उपस्थित होते. या स्कायवॉकचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहायक अभियंता प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता अमित दसूरकर यांचा पालकमंत्री शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कणेकर मार्गावरील गर्दी होणार कमी
रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाशी थेट जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आकाश मार्गिकेमुळे वांद्रे (पूर्व) परिसरातील पादचारी वाहतूक अधिक सुरक्षित होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतूक आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी व अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि वेळ बचत करणारी सुविधा म्हणून या आकाश मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे असे अॅड.आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
स्कायवॉकची वैशिष्ट्ये
- आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची
- पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने
- सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी २ स्वयंचलित सरकत्या जिन्यांची जोड
- सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे