अहवाल सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य असतानाही आयसीएसई, सीबीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळांसह काही खासगी शाळांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात मराठी न शिकविणाऱ्या शाळांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केली होती. याची गंभीर दखल घेत अशा शाळांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्यापन सक्तीचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचनाही जारी केली होती. या अधिसूचनेच्या आधारे शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करीत सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्याची सूचनाही केल्या. मात्र त्याकडे अनेक शाळांचे दुर्लक्ष सुरु असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला निवेदन देत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तालय कार्यालयाला यासंदर्भात त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषा न शिकविणाऱ्या शाळांची तपासणी करून त्यासंदर्भातील स्वयंस्पष्ट अहवाल राज्य सरकारला सादर करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.






