मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास वेगवान होणार आहे. कारण सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड (एससीएलआर) या कनेक्टर आर्मचे काम पूर्णत्वास आले आहे. या कनेक्टरमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहहा बहुप्रतिक्षित कनेक्टर पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुंबई विद्यापीठ आणि बीकेसीला थेट जोडणार आहे. ज्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. हा कनेक्टर एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि बीकेसी मधील दोन्ही दिशांना प्रवास वेळ जवळजवळ ३० ते ३५ मिनिटांनी कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
एससीएलआर कनेक्टरच्या दोन्ही महत्त्वाच्या भागांचे बांधकाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. लेव्हल १ वर पश्चिम द्रुतगती महामार्ग बीकेसीला जोडण्यासाठी विद्यमान वाकोला पुलाचा वापर करणाऱ्या कनेक्टर आर्म २ वर सध्या डेक स्लॅबचे काम सुरू आहे. दरम्यान, लेव्हल २ वर बीकेसीला एससीएलआर १ ला जोडणाऱ्या कनेक्टर आर्म ३ मध्ये फक्त ५४ मीटरचा एकच स्पॅन उभारायचा आहे. यासोबतच, वॉटरप्रूफिंग, वेअरिंग कोट्स, अँटी-क्रॅश बॅरीयर्स बसवणे आणि रंगकाम करणे यासारखी फिनिशिंगची कामे संपूर्ण स्ट्रक्चरवर शेवटच्या टप्प्यात आहेत.






