Tuesday, January 27, 2026

prathmesh kadam: रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’ची भावुक पोस्ट..

prathmesh kadam: रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर  ‘कोकण हार्टेड गर्ल’ची भावुक पोस्ट..

मुंबई : मराठमोळा रील स्टार प्रथमेश कदम याच्या अकाली निधनाच्या खबरांनी सोशल मीडिया विश्वासह संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते व अवघ्या २६ व्या वर्षी प्रथमेशने आजारपणाशी झुंज देत आपले प्राण गमावले. आजारातूनच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी प्रथमेशच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक चाहते, मित्रपरिवार आणि कलाकारांनी गर्दी केली होती. जड अंत:करणाने सर्वांनी त्याला अखेरचा निरोप दिला.

प्रथमेशच्या निधनाने त्याचे चाहतेच नव्हे तर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हादरले आहेत. बिग बॉस मराठी फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकर हिने प्रथमेशसाठी अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. ती स्वतः प्रथमेशच्या घरी जाऊन त्याचं अंत्यदर्शन घेऊन आली होती. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंकिताने लिहिलं आहे, “प्रथमेश, तू कित्येक वेळा घरी यायला बोलावलं होतंस, पण कधीच जमलं नाही. आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय हे समजलंच नाही. ज्या घरात कधी येता आलं नाही, त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत, काही भेटी राहून गेल्या याची खंत आयुष्यभर राहील. जिथे असशील तिथे असंच हसत रहा.” या शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रथमेश सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याचे १ लाख ८६ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, तर युट्यूबवरही त्याचा मोठा चाहतावर्ग होता. आईसोबत बनवलेल्या रील्समुळे तो विशेष ओळखला जात होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याने खंबीरपणे सांभाळली होती. मात्र, प्रथमेशच्या निधनाने त्याच्या आईवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा