पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा येथे होणाऱ्या 'इंडिया एनर्जी वीक (IEW) २०२६' च्या चौथ्या आवृत्तीचे ऑनलाईन उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार कराराचे वर्णन 'मदर ऑफ ऑल डिल्स' असे करत कौतुक केले आहे. या करारामुळे जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.
भारत आणि युरोपियन युनियन मंगळवार, २७ जानेवारी रोजी ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची म्हणजेच एफटीएची घोषणा करणार आहेत. या एफटीएच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ धोरणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी दोन्ही देश सर्वसमावेशक दृष्टीकोन तयार करतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
इंडिया एनर्जी वीक या कार्यक्रमात नेमकं काय बोलले पंतप्रधान मोदी जाणून घेऊया :
भारत आता ऊर्जा विकासावर काम करत आहे. भारत वाहतुकीवरही काम करत आहे. एनर्जी वीकच्या या नवीन आवृत्तीसाठी आज सुमारे १२५ देशांचे प्रतिनिधी गोव्यात जमत आहेत. जे ऊर्जा सुरक्षित आणि शाश्वत भविष्याबद्दल चर्चा करत आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की; "तुम्ही सर्वजण ऊर्जा सुरक्षित आणि शाश्वत भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी भारतात आला आहात. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. कालच, भारत आणि युरोपियन युनियनने एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. जगभरातील लोक "मदर ऑफ ऑल डिल्स" म्हणून त्याची चर्चा करत आहेत. हा करार १४० कोटी भारतीयांसाठी तसेच युरोपातील अनेक नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे."
PM @narendramodi’s remarks during the India Energy Week. https://t.co/AzhUyYCQR0
— PMO India (@PMOIndia) January 27, 2026
जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वय :
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये होणाऱ्या कराराबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा करार जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा करार जागतिक जीडीपीच्या जवळपास २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो. हा करार व्यापारासोबतच लोकशाही आणि कायद्याच्या राज्याप्रती आपली सामायिक वचनबद्धता मजबूत करतो.
गुंतवणूकदारांसाठी मोठा फायदा :
भारतातील वाढत्या संधींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत देखील उत्कृष्ट संधी प्रदान करतो. आज, आम्ही जगातील पेट्रोलियम उत्पादनांच्या टॉप ५ निर्यातदारांपैकी एक आहोत. आमची निर्यात व्याप्ती १५० हून अधिक देशांमध्ये पसरलेली आहे. भारतातील या वाढत्या संधी तुम्हाला फार उपयोगात येणार आहेत. म्हणूनच, एनर्जी वीकचे हे व्यासपीठ आमच्या भागीदारीचा शोध घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आमच्याकडे प्रचंड शुद्धीकरण क्षमता आहे. शुद्धीकरण क्षमतेत आम्ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि लवकरच पहिल्या क्रमांकावर येऊ. आज, भारताची शुद्धीकरण क्षमता अंदाजे २६० एमएमटीपीए आहे. ती ३०० एमएमटीपीए पर्यंत वाढवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा फायदा आहे.






