शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे
सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात जिल्हा परिषदेसाठी बांदा व पंचायत समितीसाठी शेर्ले बिनविरोध ठरल्याने जि.प. ८ व पंचायत समितीच्या १७ जागांवर लढत होणार आहे. यातील आंबोली व मळेवाड जि.प. तर, आंबोली, कोलगाव, विलवडे, इन्सुली, मळेवाड, न्हावेलीत शिवसेना व भाजपने एबी फॉर्म कायम ठेवल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
यात जिल्हा परिषद ९ मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला. याठिकाणी भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध ठरले. तर माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ अपक्षांनी माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया रविंद्र मडगावकर विरुद्ध अपक्ष शिवानी नाईक यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश तळवणेकर यांच्यासह ३ अपक्षांनी माघार घेतली. यामुळे भाजपचे महेश सारंग विरूद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्यात लढत होणार आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून गुणाजी गावडे व चंद्रकांत कुबल यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे विक्रांत सावंत विरुद्ध उबाठा शिवसेनेचे दिनेश सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे. बहुचर्चित आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील घटक पक्ष भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेत. दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म कायम ठेवल्याने येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शिवसेनेच्या सुप्रिया गावडेंच्या विरोधात भाजपच्या शोभा गावडेंनी दंड थोपटले आहेत.
तळवडे मतदारसंघातून तब्बल ६ अपक्षांनी माघार घेतली. भाजपच्या बंडखोर प्रमोद गावडेंनी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकाणातून बाजूला होण्याचे संकेत देत लढतीतून माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे संदीप गावडे, उबाठाचे रूपेश राऊळ यांच्यासह भाजपचे बंडखोर अपक्ष गंगाराम ऊर्फ अमेय पै यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इन्सुलीत उबाठाच्या फिलीप रॉड्रिग्ज, माजी सभापती मानसी धुरी अशा तिघांनी माघार घेतली. यामुळे शिवसेनेचे झेवियर फर्नांडिस, अपक्ष नितिन राऊळ व भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा बंडखोर अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून एका अपक्षाने माघार घेतली असून प्रियांका नारोजी शिवसेना, भाजपच्या अपर्णा सातोसकर व अपक्ष सानिका शेवडे यांच्यात लढत होणार आहे. महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून अमेय आरोंदेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे शिवसेनेचे सुदन कवठणकर यांच्यासह भाजपच्या बंडखोर माजी सभापती शर्वाणी गांवकर व अपक्ष सिद्धेश नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २२ जाणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर ९ पैकी लढत होणाऱ्या ८ जिल्हा परिषद मतदारसंघातून २० जण आपल नशीब आजमावत आहेत.






