Tuesday, January 27, 2026

नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार

नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार

महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो लाईन ८ चा मार्ग उभारण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. 'मेट्रो लाईन ८'ची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून, त्यापैकी ९.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत तर २४.६३६ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मार्गावर एकूण २० स्थानके प्रस्तावित असून, त्यामध्ये ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर पूर्वपर्यंतचा मेट्रो मार्ग भूमिगत असणार आहे, तर घाटकोपर पश्चिम स्थानकापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकापर्यंतचा मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. दोन स्थानकांमधील सरासरी अंतर १.९ किलोमीटर इतके ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. ........ समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत आणि कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन ८ संदर्भातील भूसंपादनासह सर्व प्रकारच्या मंजुरीची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. ....... नाशिक शहर परिक्रमा मार्ग गतिमान - याच बैठकीत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्यास मान्यता देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. - तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे–कोनसरी–मूळचेरा–हेदरी–सुरजागड या ८५.७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. हा महामार्ग चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा असणार असून, त्यामुळे औद्योगिक आणि खनिज वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
Comments
Add Comment