कोलकाता : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका सुक्या अन्नाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आणि शेजारील डेकोरेटरच्या गोदामाला भीषण आग लागली. तब्बल १५ तास उलटूनही आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांचे मृतदेह हाती लागले असून, २० जण ढिगाऱ्याखाली बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग इतकी वेगाने पसरली की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल जेसीबी मशीन्स आणि आधुनिक रोबोटिक कॅमेऱ्यांची मदत घेत आहे. सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणीची मदत घ्यावी लागणार आहे. बेपत्ता कर्मचारी पंकज हलदार याने मध्यरात्री ३:३० च्या सुमारास आपल्या नातेवाईकांना अखेरचा फोन केला होता. "कारखान्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद आहे, आम्ही भिंत तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय," हे त्याचे शेवटचे शब्द ऐकून नातेवाईकांनी हंबरडा फोडला आहे.
मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये येत्या काळात ...
ऊर्जामंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
आनंदपूर येथील सुक्या अन्नाच्या गोदामाला आणि मोमो फॅक्टरीला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करण्यामागे कारखान्यातील ज्वलनशील पदार्थ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री कारखान्यात 'नाईट शिफ्ट'चे काम जोरात सुरू असतानाच मध्यरात्री ३ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कारखान्यात साठवून ठेवलेले पाम तेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले, ज्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीची तीव्रता एवढी वाढली की पहाटे लागलेली आग विझवण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत झुंज द्यावी लागली. अद्यापही काही ठिकाणी धुमसणारी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला असून, मृतांच्या आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. परिसरातील अरुंद रस्ते आणि आगीमुळे पसरलेल्या काळपट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत शिरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.






