मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शिवसेनेची नोंदणी थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला नाही
मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीसह विविध महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी गट नोंदणी करताना संख्याबळाच्या टक्केवारीचे गणित लक्षात घेतले जाईल. त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेची एकत्र नोंदणी करायची, की स्वतंत्र, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केली.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांनी त्यांच्या नगरसेवक गटांची नोंदणी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्याने भाजपची गट नोंदणी रखडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्री परतल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेची गट नोंदणी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी मंगळवारी (२७ जानेवारी) होणार होती. मात्र, अचानक घडलेल्या घडामोडींमुळे ही नोंदणी पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी गट नोंदणीमागील गणित स्पष्ट केले. ते म्हणाले, “गट स्थापन करताना केवळ संख्या नव्हे, तर टक्केवारीचा विचार करावा लागतो. कधी एकत्रित गट नोंदणी केल्यास फायदा होतो, तर कधी वेगवेगळे गट स्थापन केल्याने अधिक लाभ मिळतो. काही वेळा एखादा छोटा गट दुसऱ्या गटासोबत जोडल्यासही फायदा होतो. महापौर आणि उपमहापौरपद वगळता उर्वरित पदांचे वाटप हे एकूण संख्येच्या टक्केवारीवर ठरते. त्यामुळे सर्व पर्यायांचा अंदाज घेऊनच निर्णय घेतला जातो”, असे त्यांनी सांगितले. चर्चेतून निर्णय घेणार
भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेची गट नोंदणी थांबवण्यात आल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हस्तक्षेप असा काही प्रकार नसतो. आम्ही एकत्र काम करणारे असून चर्चेतूनच निर्णय घेतले जातात. शिवसेनेची नोंदणी ठरल्याप्रमाणे होईल आणि त्यानुसार भाजपचीही गट नोंदणी केली जाईल. गट नोंदणीत केवळ टक्केवारीचे राजकीय गणित महत्त्वाचे असून स्थायी समितीत जास्तीतजास्त सदस्य कसे मिळतील, यासाठी योग्य संयोजन केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.






