Tuesday, January 27, 2026

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी असावा अशाप्रकारची स्पष्ट बदल अध्यादेशात करण्यात आल्यानंतर पिठासीन अधिकारी म्हणून आता महापालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली महापौरांची निवड होणार असून या यापुढे उपमहापौर पदाची निवडणूकही नवनिर्वाचित महापौरांऐवजी नियुक्त पिठासीन अधिकारीच करणार आहे. त्यामुळे यापुढे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया ही पिठासीन अधिकारीच पार पाडणार आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांना महापौर आणि उपमहापौर पदाचे वेध लागले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षित प्रवर्गातील कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र या निवडणुकीत पूर्वी सलग निवडणुकीत मावळते महापौर किंवा खंड पडल्यास ज्येष्ठातील ज्येष्ठ नगरसेवक हे पिठासीन अधिकारी असतील अशाप्रकारचा उल्लेख होता. त्यामुळे या पदावर ज्येष्ठातील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून माजी महापौर श्रध्दा जाधव यांची पिठासीन अधिकारी म्हणून निवड केली जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतु नगरविकास खात्याच्या माध्यमातून यासाठीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी नगरविकास खात्याने पिठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी असावा अशाप्रकारचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

मागील २२ जानेवारी रोजी याबाबतचा अध्यादेश जारी झाल्यानंतर २३ जानेवारी रोजी सुधारीत अध्यादेश पुन्हा जारी करून पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ भुषण गगराणी यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत आता पिठासीन अधिकारी म्हणून गगराणी हे काम पाहणार आहेत.

महापौरांसह उपमहापौरांच्या निवडणुकीतही आयुक्तच पिठासीन अधिकारी

महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. परंतु आता यातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया नवनिर्वाचित महापौरांऐवजी पिठासीन अधिकारी म्हणून डॉ भूषण गगराणी हेच सांभाळतील अशाचा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment