Tuesday, January 27, 2026

बाळासाहेब ठाकरेंनी टीका केलेल्या सोनिया गांधी राऊतांना वंदनीय झाल्या का ?

बाळासाहेब ठाकरेंनी टीका केलेल्या सोनिया गांधी राऊतांना वंदनीय झाल्या का ?

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा परखड सवाल 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, आनंद दिघे वंदनीय आहेत. संजय राऊत तुम्हाला नेमकं कोण वंदनीय आहे असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. ज्या सोनिया गांधी यांच्यावर करप्शन क्वीन म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती, त्या सोनिया गांधी उबाठा गट आणि राऊतांसाठी वंदनीय झाल्या आहेत. राहुल गांधी, एमआयएम हे राऊतांसाठी परमपूज्य झाले आहेत अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोण कुणाचे अंगवस्त्र आहे यावर हीन भाषेत बोलण्याऐवजी सत्यस्थिती काय आहे हे जनतेला ठाऊक आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची गुलामी करण्या पलिकडे उद्धव ठाकरे आणि राऊतांनी काहीही केले नाही असेही श्री. बन म्हणाले. जनतेने उबाठा गटाला घरी बसवले आहे. मुंबईत भाजपा महायुतीचाच महापौर होईल याचा पुनरुच्चार करत श्री. बन म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राऊतांनी मुंबईमध्ये एमआयएम किंवा काँग्रेसचा महापौर केला असता. आपल्या पक्षाची अगरबत्ती कुठे विझली आणि कोणामुळे विझली याचा विचार राऊतांनी केला तर बरे होईल अशी कोपरखळीही श्री. बन यांनी मारली. उद्योगमंत्री उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपा मध्ये चालले आहेत या राऊतांच्या मुक्ताफळांचा खरपूस समाचार घेत श्री.बन म्हणाले की, राऊतांनी कुडमुड्या ज्योतिषाप्रमाणे भविष्यवाणी करणे सोडावे. तुमचे 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला वैतागून गेले. ना जनता ना कार्यकर्ते ना आमदार ना मंत्री कोणालाही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे भेटत नव्हते. त्यामुळेच 40 आमदार उबाठांना सोडून दिले याचे स्मरण श्री. बन यांनी करून दिले. कोश्यारी यांच्या पद्म पुरस्कारवरून राऊतांचे हीन राजकारण भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर पद्म पुरस्कार मिळाला आहे. मात्र श्री.कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा कारभार चोखपणे वठवताना महाराष्ट्रातील तत्कालिन भ्रष्ट उबाठा सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच श्री.कोश्यारींना पद्म पुरस्कार घोषित झाल्यावर राऊतांच्या पोटात दुखत आहे. श्री. कोश्यारींनी महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर द्रोह करून सत्ता मिळवणा-या उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या कारभारावर वारंवार बोट ठेवल्यामुळे उद्धव आणि राऊतांचा अहंकार दुखावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी कधीही कोश्यारी यांच्या चुकीच्या वक्तव्यांबाबत समर्थन केले नाही. मात्र सातत्याने श्री. कोश्यांरींच्या वक्तव्यांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सत्तेत असताना उबाठा गट आणि राऊतांनी केला होता याची आठवण श्री, बन यांनी करून दिली. आदिवासी आंदोलनाला फूस देण्याची उबाठा गटाची खेळी भाजपाने नेहमीच आदिवासींच्या जल, जमीन आणि जंगल हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला. संजय राऊत आणि उबाठा गट मात्र केवळ आगीत तेल ओतण्याचे काम करतात. आदिवासी आंदोलनाला फूस देण्याची खेळी उबाठा गटाकडून खेळली जात आहे असा घणाघात श्री. बन यांनी केला. फडणवीस, शिंदे मैदानात, उद्धव ठाकरे घरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही 24 तास महाराष्ट्रासाठी आणि जनहितासाठी झटत आहेत. उद्धव ठाकरे यांना आता नेमके काय काम आहे? कंपाउंडर राऊतांसारखेच डब्ल्यूएचओ चे ते सल्लागार म्हणून कारभार सांभाळतात का असे सवाल श्री. बन यांनी केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा