Tuesday, January 27, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून सुरवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून सुरवात

जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग

२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे राज्यभर घेणार प्रचार सभा

सातारा ( महाबळेश्वर) : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून त्यांची सुरवात आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आली.

या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे २८ जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर २९ जानेवारी रोजी सोलापूर धाराशिव येथे, तर ३० जानेवारी रोजी पुणे सांगली जिल्ह्यात, ३१ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेवारासाठी प्रचारसभा आणि रोड शो घेणार आहेत. निवडणुका म्हटल्या की शिंदे प्रचारात कोणतीही कसूर ठेवत नाहीत त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आल्याशिवाय राहणार नाही.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी ७१ प्रचार सभा घेतल्या होत्या, नगरपालिका निवडणुकीत ५४ प्रचार सभा घेतल्या होत्या, त्यानंतर नुकत्याच पार पाडलेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी २९ प्रचारसभा २० रोड शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आज तळदेव येथे पहिली सभा पार पडल्यानंतर उद्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा येथे त्यांची दुसरी प्रचारसभा पार पडणार आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पक्षाचा हाच दबदबा कायम राखण्यासाठी शिंदे मैदनात उतरले असून, येत्या आठवडाभर आपल्या प्रचार सभांनी ते महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा एकदा पक्षाची यशस्वी घडदौड कायम राखण्यासाठी ते पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >