Tuesday, January 27, 2026

Pune Crime News : ५० तोळे सोने अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही 'तिचा' छळ, गर्भपात केला; इंजिनिअर दीप्ती चौधरीने घेतला गळफास!

Pune Crime News : ५० तोळे सोने अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही 'तिचा' छळ, गर्भपात केला;  इंजिनिअर दीप्ती चौधरीने घेतला गळफास!
पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. दीप्ती मगर-चौधरी असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचा पती, सरपंच सासू, शिक्षक सासरे आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी छळ आणि मुलगी नको म्हणून जबरदस्तीने केलेला गर्भपात यामुळे दीप्ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती समोर आली आहे.

लग्नात ५० तोळे सोने, २५ लाखांची गाडी; तरीही पैशांची हाव कायम!

दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये रोहन चौधरी याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात ५० तोळे सोने देऊनही सासरच्यांची पैशांची हाव संपली नाही. माहेरून १० लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडीसाठी २५ लाख रुपये देऊनही तिचा छळ सुरूच होता. "तू दिसायला सुंदर नाहीस, तुला घरातील कामे येत नाहीत," असे टोमणे मारून दीप्तीचे सतत मानसिक खच्चीकरण केले जात होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण केली जात होती, अशी तक्रार दीप्तीच्या आईने दिली आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दीप्तीला झालेली गर्भपाताची सक्ती. दीप्तीला पहिली मुलगी होती. दुसऱ्यांदा ती गरोदर असताना, 'वंशाला दिवा हवा' या हट्टातून सासरच्यांनी तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी केली. पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, तिची इच्छा नसतानाही तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. या अमानुष प्रकारामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. विशेष म्हणजे, दीप्तीची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक पेशात आहेत. समाजात जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनीच अशा प्रकारे हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्येसारखे गुन्हे केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >