जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक प्रवासी बस आणि पिकअप ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सीआरपीएफ (CRPF) जवानासह एकूण चार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर परिसरात बस आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सीआरपीएफच्या १३७ व्या बटालियनचे सेकंड-इन-कमांड करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५२ व्या बटालियनच्या एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे लष्कराचे वाहन घसरून झालेल्या अपघातात जवान रिंकिल बालियान यांच्यासह नऊ सैनिक शहीद झाले होते. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.#WATCH | Udhampur, J&K | Four, including one CRPF personnel, die in a road accident on the Jammu-Srinagar National Highway. pic.twitter.com/hH26LJPfv6
— ANI (@ANI) January 27, 2026
आज भाजप खासदार अरुण गोविल आणि भाजप नेते संजीव बालियान यांनी शहीद रिंकिल बालियान यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. कठीण प्रसंगात सरकार आणि पक्ष शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही यावेळी नेत्यांनी दिली.






