पुणे : विद्यमान सरपंच सासू आणि शिक्षक पेशात असलेल्या सासर्यांच्या घरात एका उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेचा छळापोटी करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना सोरतापवाडी येथे घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी या २८ वर्षीय महिलेने शनिवारी रात्री सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, सुशिक्षित कुटुंबातील ही विकृती पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. दीप्तीच्या आईने उरुळी कांचन पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर दीप्तीचा सतत छळ केला जात होता. तिला घरची कामे येत नसल्याचे टोमणे मारणे, तिच्या रूपावर टीका करणे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणे असे प्रकार सुरू होते. मुलीचा संसार वाचावा म्हणून माहेरून लाखो रुपये आणि गाडी देऊनही सासरच्यांची पैशांची हाव शमली नाही.
पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. ...
"माझी इच्छा नसताना गर्भलिंग तपासणीची सक्ती केली अन्...
आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीतून सासरच्या मंडळींच्या विकृत मानसिकतेचा नवा पुरावा समोर आला आहे. पहिली मुलगी असल्यामुळे दुसऱ्या वेळी वंशाच्या दिव्याच्या हट्टापायी दीप्तीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. नोव्हेंबर २०२५ मध्ये जेव्हा दीप्ती माहेरी आली होती, तेव्हा तिने रडत रडत आपल्या आईकडे पतीच्या क्रूर वागणुकीचा पाढा वाचला होता. दीप्ती पाच महिन्यांची गरोदर असताना, तिच्या पोटातील बाळ मुलगा आहे की मुलगी, हे तपासण्यासाठी पतीने तिच्यावर जबरदस्ती केली. पहिली मुलगी असल्याने यावेळी मुलगाच हवा, असा सासरच्यांचा अट्टहास होता. जेव्हा दीप्तीने या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीला स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा पती रोहन चौधरी याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. माहेरी आल्यावर दीप्ती प्रचंड दहशतीखाली होती. "माझी इच्छा नसताना पतीने मला मारहाण केली," असे सांगताना ती धाय मोकलून रडत होती, असे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे.
वंशाला दिवा हवा, नाहीतर घर सोड; सासर्यांनी सुनेला दिली होती धमकी
"आम्हाला वंशाला दिवाच हवा, तू तपासणी करणार नसेल तर घरातून चालती हो," अशा शब्दांत सरपंच सासू आणि शिक्षक सासर्यांनी दीप्तीला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. या मानसिक दडपणाखाली तिची इच्छा नसतानाही तिची गर्भलिंग तपासणी करण्यात आली आणि पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच सासरच्यांनी निर्दयीपणे तिचा गर्भपात घडवून आणला. दीप्ती गरोदर असताना सासू सुनीता आणि सासरे कारभारी यांनी तिला वंशाच्या दिव्यासाठी गर्भलिंग तपासणी करण्याची सक्ती केली. तिने नकार दिल्यावर तिला घरातून हाकलून देण्याची आणि ही गोष्ट माहेरी न सांगण्याची धमकी दिली. सासरच्यांच्या सततच्या दबावामुळे दीप्तीने नाईलाजाने तपासणी केली. मात्र, पोटातील बाळ मुलगी असल्याचे निष्पन्न होताच पती रोहन, सासू, सासरे आणि दीर रोहित या सर्वांनी मिळून दीप्तीची इच्छा नसतानाही तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. माहेरी आल्यावर दीप्तीने रडत रडत हा सर्व भयानक अनुभव आपल्या आईला सांगितला होता. सासरच्या या विकृत वागणुकीमुळे दीप्ती पूर्णपणे मानसिक धक्क्यात होती, असे तिच्या आईने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.
हुंडा, छळ आणि सक्तीचा गर्भपात...
माहेरून लाखो रुपये आणि हुंडा देऊनही सासरच्यांची हाव संपली नव्हती. उलट, चारचाकी गाडीसाठी माहेरून अधिक पैसे आणण्यासाठी दीप्तीचा छळ केला जात होता. या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळूनच दीप्तीने टोकाचे पाऊल उचलले असून, तिच्या मृत्यूला सासरचे चारही सदस्य जबाबदार असल्याचा थेट आरोप तिच्या आईने केला आहे. पती रोहन, सासू सुनीता, सासरे कारभारी आणि दीर रोहित चौधरी यांनी वेळोवेळी दीप्तीकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. चारचाकी गाडी घेण्याच्या बहाण्याने तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. केवळ पैसेच नाही, तर दीप्तीला टोचून बोलणे आणि तिची इच्छा नसताना तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडणे, यामुळे ती पूर्णपणे खचली होती. सासरच्यांच्या या सततच्या छळामुळे आणि अमानुष वागणुकीमुळे दीप्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सासरच्या चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. तीन वर्षाच्या मुलीसमोरच इंजिनियर विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी असे पतीचे नाव आहे तर सुनीता चौधरी सासूचे नाव आहे, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दिराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याचं बोलंल जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. अधिकचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये देऊनही सुनेचा छळ
दरम्यान, दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी सरपंच सासू सुनीता चौधरी आणि पती रोहन चौधरी यांना अटक केली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विवाहात दीप्तीच्या कुटुंबाने ५० तोळे सोने देऊनही सासरच्यांची पैशांची भूक शमली नव्हती. मुलीचा संसार सुखाचा व्हावा या आशेने माहेरच्यांनी वेळोवेळी १० लाख रुपये रोख आणि गाडीसाठी २५ लाख रुपये दिले, मात्र इतकी मोठी रक्कम स्वीकारूनही दीप्तीचा छळ थांबला नाही, ज्याचा अंत अखेर तिच्या आत्महत्येने झाला. केवळ पैशांसाठीच नाही, तर दीप्तीच्या रूपावरून तिला टोमणे मारणे, ती सुंदर नसल्याचे म्हणणे, तिला घरकाम येत नसल्याचे आरोप करणे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणे अशा विविध मार्गांनी तिचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. आरोपी सासू सुनीता चौधरी या अवघ्या काही महिन्यांपूर्वीच सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या, तर सासरे शिक्षक पेशात आहेत. समाजातील प्रतिष्ठित पदांवर असूनही या कुटुंबाने केलेल्या क्रूर वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवत सासू आणि पतीला अटक केली असून, या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.






