Tuesday, January 27, 2026

रत्नागिरी जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा

रत्नागिरी जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा

महायुतीची वर्चस्वासाठी तर महाविकास आघाडीची अस्तीत्वासाठी लढाई 

नरेंद्र मोहिते रत्नागिरी : तब्बल आठ वर्षांनी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. रत्नागिरी जिल्हयातील नऊ तालुक्यातील ५६ जिल्हा परिषदेचे गट, ११२ पंचायत समितीचे गण यामध्ये या निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा सध्या सुरू आहे. जिल्हयात शिवसेना भाजपा महायुती झाली असून महायुती विरूध्द अन्य पक्ष असाचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने अनेक ठिकाणी उबाठा, काँग्रेससह अन्य घटकपक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली असून नगर परिषद निवडणूकीप्रमाणेच याही निवडणूकीत महायुती बाजी मारणार काय याबाबत साऱ्यानांच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ही निवडणूक महायुतीची वर्चस्वासाठी लढाई तर महाविकास आघाडीची अस्तित्वासाठी लढाई सुरू असल्याचे जिल्हयात चित्र पहावयास मिळत आहे.
रत्नागिरी जिल्हयावर कायमच महायुतीचे वर्चस्व राहिलेले आहे. खास करून हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. मात्र, सन २०२२ मध्ये शिवसेना दुभंगल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने या निवडणूकीकडे राजकिय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. जिल्हयातील नऊ तालुक्यात असलेल्या राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड व गुहागर या पाच विधानसभा मतदारसंघात मिळून ही निवडणूक होत आहे. या पाच विधानसभा मतदार संघात राजापूर,रत्नागिरी व खेड मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर चिपळूण विधानसभा मतदार संघातही महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम प्रतिनिधीत्व करत आहेत. तर केवळ गुहागर या एका मतदार संघात उबाठाचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्हयावर महायुतीचेच वर्चस्व असल्याचे लोकसभा, विधानसभा व त्यानंतर झालेल्या नगर परिषद निवडणूकीत स्षष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समितवर वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे.
जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गटात व ११२ पंचायत समिती गटात होत असलेल्या या निवडणूकीत तालुका निहाय गट  गणांची संख्या ही पुढील प्रमाणे आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गटांमध्ये मंडणगड-२, दापोली-६, खेड -७, चिपळूण -९, गुहागर-५, रत्नागिरी – १०, संगमेश्वर -७, लांजा- ४ व राजापूर-६ गटांचा समावेश आहे.  तर ११२ पंचायत समिती गणांमध्ये मंडणगड-४, दापोली-१२, खेड -१४, चिपळूण -१८, गुहागर-१०, रत्नागिरी – २०, संगमेश्वर -१४, लांजा- ८ व राजापूर-१२ गणांचा समावेश आहे. जिल्हयातील या एकूण ५६ गट व ११२ गणांमध्ये होणाऱ्या निवडणूकीत एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ इतके मतदार असून यामध्ये ५ लाख ६४ हजार ४७६ पुरूष तर ६ लाख ८ हजार ९१३ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांचे भवितव्य हे महिला मतदार ठरविणार आहेत. या निवडणूकीसाठी जिल्हयात १ हजार ६९३ इतकी मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह तालुका पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत यापुर्वीच झालेली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झालेले आहे. तर नऊ पंचायत समितींमध्येही सभापती पदाची आरक्षण सोडत झालेली असून यातील राजापूर पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांच्या मागस प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. तर दापोली पंचायत समितीचे सभापती पद हे नगरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर उर्वरित मंडणगड, खेड, संगमेश्वर व लांजा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित असून चिपळूण, गुहागर व रत्नागिरीचे सभापतीपद सर्वसाधारण आहे.  या निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपली असुन जिल्हयातील एकूणच लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आता सर्वच राजकिय पक्ष व उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे.
जिल्हयात महायुतीच्या माध्यमातुन महायुती निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. राज्याचे उद्योगमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदय सामंत व राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून महायुतीच्या वर्चस्वासाठी या दोन्ही मंत्र्यांसह महायुतीचे आमदारही निवडणूकीच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत. नगर परिषद निवडणूकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र जिल्हयात असून काहीशा दिशाहीन झालेली महाविकास आघाडी व त्यातील घटक पक्ष हे अस्तीत्वासाठी धडपडत असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. या निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या मात्र ग्रामीण भागात प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >