मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातीच्या एक हजाराहून अधिक पशू प्रदर्शन होणार असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.
या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल," असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला.
नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






