मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाप्रमाणेच राज्याच्या विकासाला गती देणारा शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा असेल.
स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर जनतेच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न यांचा सर्वांगीण विचार करून एमएसआरडीसीने शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन तयार केला आहे. आधीचा ८४० किमीचा महामार्ग आता ८५६ किमीचा झाला आहे. आधी १२ जिल्ह्यांतील ३५० गावांतून जाणार असलेला हा मार्ग आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार आहे. या महामार्गामुळे प्रवास वेगाने होईल. मालवाहतूक करणे सोपे होईल.
शक्तिपीठ महामार्गात आता सातारा या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.
आधी जुन्या प्लॅननुसार १४६ गावांतील मोजणी झाली होती. यातील आवश्यक ती माहिती वापरली जाईल आणि जिथे गरज असेल तिथे पुन्हा मोजणी घेतली जाईल तसेच उर्वरित गावांतही जमीन मोजणीची कामं वेगाने केली जातील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. जमीन मोजणी पूर्ण केल्यानंतर कायद्यानुसार योग्य तो मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.






