बर्न : सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने ४७ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला होता. भारताच्या कारवाईपुढे पाकिस्तानचे हवाई संरक्षण निकामी झाले. भारताने सात ते दहा मे २०२५ दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांना थोपवण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. भारताच्या हवाई दलाने राफेल आणि मिराज-२००० विमानांचा वापर करून बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा हे हल्ले थोपवण्यात पुरती अपयशी ठरली. प्रत्युत्तर देण्याची क्षमता गमावल्यानंतर, पाकिस्तानने १० मे रोजी दुपारपर्यंत युद्धबंदीची विनंती केली, जी भारताने मान्य केली.
पाकिस्तानने भारतावर सात मे रोजी ९०० ड्रोन वापरुन हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या आकाशतीर नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक जामिंगमुळे पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी झाला. भारताने हे ड्रोन सीमेच्या आसपासच्या भागात सहज पाडले. भारताच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला, असे सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
भारताने दहा मे रोजी पहाटे दोन ते पाच दरम्यान ब्राह्मोस आणि स्कॅल्प-ईजी सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानी हवाई तळांवर आणि रडार सुविधांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने, रडार आणि कमांड सेंटर नष्ट झाली. धावपट्टी नष्ट झाल्यामुळे पाकिस्तानी हवाई दल घाबरले आणि दुपारपर्यंत इस्लामाबादला हार मानावी लागली. यानंतर पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केल्याचे सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
लष्करी इतिहासकार एड्रियन फोंटानेलाझ यांनी तयार केलेल्या आणि स्विस हवाई दलाच्या निवृत्त मेजर जनरलसह तज्ज्ञांच्या पॅनेलने पुनरावलोकन केलेल्या या अहवालात भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा आणि पाकिस्तानचा पुरता पराभव झाल्यामुळेच त्यांनी युद्धबंदीची विनंती केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारताने राजकीय आणि लष्करी उद्दीष्टे साध्य केली असाही या अहवालाचा निष्कर्ष आहे.






