झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात बुडाली. बुडालेल्या बोटीत ३५० पेक्षा जास्त नागरिक होते. यातील अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकाने १५ मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत. अद्याप २८ जण बेपत्ता आहेत. बचाव पथकाने ३१६ जणांना वाचवले आहे.
बुडालेली बोट ही इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर सेवा होता. बोटीत ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते. समुद्रातून प्रवास करत असताना बोटीत तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे सोमवारी पहाटे बोट समुद्रात बुडाली.
समुद्रात असताना सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांनी बोटीकडून एक संकटात सापडल्याचा संदेश पाठवण्यात आला. हा संदेश मिळताच बचाव पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पण पथक पोहोचण्याआधीच बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर बोट बुडाली. वाचलेल्या प्रवाशांना तटरक्षक दलाने तातडीने बालुक द्वीप गावात नेले, तिथेच त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले.
तटरक्षक दलाची टीम तसेच तटरक्षक दलाचे एक विमान, हवाई दलाची आणि नौदलाची टीम हे सर्वजण संयुक्तपणे मदतकार्य करत आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. बोट बुडण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी चौकशी होणार आहे.
फिलिपाईन्समध्ये बोट बुडण्याच्या घटना अनेकदा घडतात. फिलिपाईन्सच्या बेटांच्या दरम्यान लहान - मोठी चक्रीवादळे वारंवार येत असतात. या चक्रीवादळांमुळे तसेच जहाजांची योग्य निगा न राखणे, गर्दी आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी न होणे या कारणांमुळेही फिलिपाईन्समध्ये अनेकदा बोटी बुडाल्या आहेत. ताज्या दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.






