वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर चीनसोबत कोणताही व्यापार करार केला, तर त्यावर १०० टक्के शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की कॅनडा स्वतःला चीनसाठी असा मार्ग बनू देत आहे, ज्याद्वारे चीनी माल अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करू शकतो. ट्रम्प यांनी उघडपणे इशारा दिला की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जर कॅनडाला चीनसाठी ‘ड्रॉप-ऑफ पोर्ट’ बनवले, तर ती त्यांची फार मोठी चूक ठरेल. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, अशा कोणत्याही कराराच्या परिस्थितीत अमेरिकेत येणाऱ्या कॅनडाच्या सर्व उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाईल.
ट्रम्प आणि कॅनडामधील तणाव सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही कमाल पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँडमध्ये प्रस्तावित ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्प नाकारल्याबद्दल कॅनडावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की हा प्रकल्प कॅनडाच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरला असता; मात्र कॅनडा अमेरिकेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी चीनसोबत संबंध अधिक दृढ करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागतिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यामुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत. कार्नी यांनी सांगितले की जग आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे दशकानुदशके चालत आलेली नियमाधारित जागतिक व्यवस्था अस्पष्ट होत चालली आहे. त्यांनी अमेरिकेने आपली इच्छा इतर देशांवर लादण्याच्या धोरणावर टीका करत म्हटले की, मध्यम शक्तीच्या देशांनी आता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीमुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे, कारण अमेरिका हा कॅनडाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. जर १०० टक्के शुल्क लागू झाले, तर कॅनडाचा निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात ठप्प होऊ शकतो आणि तेथील कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाशी कोणतीही तडजोड करणार नाहीत.






