Saturday, January 24, 2026

स्थायी समितीवर कुणाची लागणार वर्णी?

स्थायी समितीवर कुणाची लागणार वर्णी?

कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांच्या नावाचा होऊ शकतो विचार

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन करून महापौरांसह स्थायी समिती आणि इतर समित्यांचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत. मात्र, मुंबईचा महापौरपदापेक्षा मोठी समिती म्हणून ओळखली जाते ती स्थायी समिती. या समितीवर सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी अनेक विविध पक्षांच्या नगरसेवकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे महापालिकेतील या सर्वोच्च अशा स्थायी समितीवर कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागली जाईल याचा अंदाज यामाध्यमातून घेण्यात आला आहे.

स्थायी समिती ही वैधानिक समिती असून या समितीमध्ये आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. प्रकल्प कामांसह कंत्राट कामांना या समिती त मंजुरी दिली जाते. या समितीत २६ सदस्य असतात. यात शिक्षण समिती अध्यक्ष हे पदसिध्द सदस्य असतात. सध्या भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, एमआयएम आणि मनसेचे नगरसेवक संख्याबळ गृहीत धरता या समितीत त्यांची गणसंख्या अनुक्रमे १०,०३,०८,०३,०१ आणि ०१ एवढी आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ १३ आहे. तर उबाठा आणि मनसेचे संख्या बळ ०९ एवढे आहे. तर उबाठा, मनसे, काँग्रेस आणि एमआयएम हे पक्ष एकत्र आल्यास त्यांचे संख्या बळ १३ एवढे होणार आहे. परंतु शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने भाजपची गणसंख्या ११ होणार आहे आणि शिवसेनेची तीन गृहीत धरल्यास त्यांचे संख्याबळ १४ होणार आहे. यातच एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास महायुतीचे पारडे जड होणार आहे.

कोणत्या पक्षाच्या कोणत्या संभाव्य सदस्यांची लागू शकते वर्णी भाजप : प्रभाकर शिंदे, अॅड मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवडकर, हरीष भांदीर्गे, अलका केरकर, प्रकाश दरेकर, गणेश खणकर, सुषम सावंत, निल सोमय्या, नवनाथ बन, राखी जाधव, स्वप्ना म्हात्रे, तेजिंदरसिंग तिवाना, शिवसेना : तृष्णा विश्वासराव, अमेय घोले, अंजली नाईक, सगुण नाईक, विजेंद्र शिंदे उबाठा : किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, प्रमोद सावंत, रमाकांत रहाटे, काँग्रेस: अश्रफ आझमी एमआयएम : विजय उबाळे मनसे : यशवंत किल्लेदार.

Comments
Add Comment