Sunday, January 25, 2026

माझी आणि भारुडाची ओळख अशी झाली...

माझी आणि भारुडाची ओळख अशी झाली...
स्मृतिगंध,लता गुठे

महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्या जनसामान्यांमध्ये जागृत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भारूड. जे बहुरूड आहे ते भारूड. संत परंपरेत ज्ञानेश्वरांपासून अनेक संतांनी भारूड रचना केल्या; परंतु भारूड म्हटलं की एकनाथ महाराज डोळ्यांसमोर उभे राहतात. ३०० पेक्षा अधिक भारूडं संत एकनाथांनी लिहिली, तेही विनोदी शैलीत आणि सर्वसामान्यांचे विषय त्यामधून मांडले. यातून त्यांनी दोन उद्देश साध्य केले ते असे, करमणूक आणि दुसरा उद्देश अध्यात्मिक रसपान. सर्वसामान्यांना पटेल, रुचेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये नाथांनी भारुडे रचली त्यातून त्यांनी समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा दूर केल्या. खरं तर भारुडाविषयी असं म्हणता येईल की, लोकजीवनाच्या काळजात रुजलेले संस्कृतीचे मूळ आहे.

माझी आणि भारुडाची ओळख झाली ती अशी... आमच्या गावामध्ये कीर्तनकार बुवा येणार म्हणून गावातील लहान-थोर मंडळी कीर्तनाला उपस्थित होती. दिवे लागण्याची वेळ झाली. हळूहळू दिवे उजळू लागले. प्रत्येकाच्या हातात कंदील घेऊन जो तो चावडीसमोर येऊन जिथे जागा मिळेल तिथे विराजमान झाला. कीर्तनकार बुवांच्या साथीदाराने टाळ–मृदंगाचा ठेका धरला. अचानक समजले, कीर्तनकार बुवा उशिरा येणार आहेत. सज्ज व्यासपीठ वादक तयार होतेच तेवढ्यात एक जण व्यासपीठावर आला आणि त्याने सुरू केलं... विंचू चावला भारूड. अतिशय छान अभिनय, नृत्य करून सर्वांना हसवलं. त्या पाठोपाठ दादला नको गं बाई व असे एक-दोन भारूड सादर केले आणि कीर्तनकार बुवा तेवढ्यात तिथे हजर झाले. छान माहोल तयार झालेला पाहून त्यांनी भारूड सादर करणाऱ्या मुलाचा सत्कार केला आणि त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून भारूड माझ्या मनात रुजलं आणि त्या भारुडातील खट्याळपणा मला विशेष भावला. यानंतर अनेकदा नाथांची भारूड ऐकायला मिळाली. एक दिवस शाळेतून घरी येत असताना... मंदिराच्या समोरच्या पारावर अनेक माणसे जमा झाली होती... आणि त्यातून आवाज आला...

“ऐका हो ऐका… एक सांगतो गंमत!” आणि त्या सुमधुर पहाडी आवाजाने अख्खा परिसर दुमदुमला. मी मागे वळून पाहिलं, डोक्यावर मोरपिसाची उलटी टोपी घातलेला अंगात अंग होळकर अंगरखा हातात टाळ एका बाजूला झोळी अडकवलेली अशा थाटात असलेला वासुदेव भारुडाबरोबर नृत्यही सादर करू लागला. छान गोल गिरकी घेऊन त्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि पाराचा क्षणात रंगमंच झाला. आजूबाजूची लोकही जमा झाली आणि जोगवा भारूड त्याने सादर केलं त्यातून नाथांनी आदिशक्तीला विनम्रपणे घातलेलं गाऱ्हानं होतं. हसत, चिमटे काढत, त्याने जनसामान्यांच्या मनाचा ताबा घेतला. तेव्हा समजलं, भारूड म्हणजे केवळ करमणूक नव्हे. ते लोकमनाचं आरसपानी प्रतिबिंब आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यातून जन्मलेलं, त्याच्या बोलीतून व्यक्त झालेलं आणि त्याच्याच प्रश्नांवर बोट ठेवणारं हे लोकनाट्य, लोकगीत आणि लोककथन यांचं अनोखं मिश्रण आहे. भारूड पाहताना हसू येतं, पण हसता हसता एखादं सत्य टोचून जातं. हीच त्याची खरी ताकद.

पुढे एकनाथांच्या भारुडावर अभ्यास करताना भारूड मनाला स्पर्श करून गेलं. आणि मी या लोकसंस्कृतीच्या भारुडाच्या प्रेमात पडले. भारुडाचं स्वरूप अगदी साधं, पण प्रभावी. कोणताही भव्य रंगमंच नाही, झगमगती नेपथ्य नाही. एक-दोन कलाकार, थोडीफार वेशभूषा, टाळ–मृदंग आणि शब्दांचा खेळ. इतक्यावर भारूड उभं राहतं. अनेकदा भारूडकार स्वतःच निवेदक, अभिनेता आणि सूत्रधार असतो. कधी तो वेशांतर करतो, कधी प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो. त्यामुळे भारूड पाहणारा केवळ प्रेक्षक राहत नाही; तो त्या खेळाचा भाग होऊन जातो.

भारुडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील उपरोध. थेट बोट दाखवून सांगण्याऐवजी भारूड हसत हसत सत्य सांगतं. समाजातील दांभिकपणा, अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता हे सारे विषय भारुडात येतात, पण प्रवचनाच्या स्वरात नाहीत. एखाद्या भोळ्या पात्राच्या तोंडून, एखाद्या गंमतीदार प्रसंगातून ते उलगडत जातात. त्यामुळे ऐकणाऱ्याला न दुखावता, पण अंतर्मुख करणारी ही शैली ठरते. भारुडाचं वेगळेपण त्याच्या प्रतीकात्मकतेत आहे. अनेक भारुडांत प्राणी, पक्षी, देव, भटके, व्यापारी, फकीर अशी पात्रं येतात. ही पात्रं केवळ व्यक्ती नसतात, तर प्रवृत्तींचं प्रतीक असतात. एखादा लोभी व्यापारी म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून, तो लोभाचं मूर्त रूप असतो. एखादा भोळा गोंधळी म्हणजे अज्ञानाचं प्रतीक असतो. या प्रतीकांच्या माध्यमातून भारूड व्यापक अर्थ सांगून जातं. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत भारुडाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनपरंपरेत भारुडाला विशेष मान आहे. संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या संतांनी भारुडाचा उपयोग लोकजागृतीसाठी केला.

संत एकनाथांची भारूडं आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांनी भारुडातून जे अध्यात्म सांगितलं ते अध्यात्म माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं होतं. त्यामुळे भारूड हे केवळ लोककलेचं रूप न राहता, समाजपरिवर्तनाचं साधन बनलं. इतिहासाच्या प्रवाहात भारुडाने अनेक रूपं धारण केली. कधी ते कीर्तनाचा भाग झाले, कधी तमाशाच्या जवळ गेले, तर कधी शाहिरी परंपरेत मिसळले. ग्रामीण जीवनातील बदल, शहराकडे झुकणारी संस्कृती, आधुनिक प्रश्न हे सारे विषय भारुडात येत गेले. तरीही त्याची मुळं लोकजीवनातच राहिली. काळ बदलला, संदर्भ बदलले, पण भारुडाची आत्मा लोकमनाशी असलेली नाळ तुटली नाही. आजच्या धावपळीच्या काळात, मोठ्या रंगमंचांवर आणि पडद्यावर चमकणाऱ्या करमणुकीच्या जगात भारूड कधी-कधी दुर्लक्षित होतं. पण जेव्हा कुठे गावच्या जत्रेत, यात्रेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भारूड सादर होतं.

लोक अजूनही भारुड ऐकतात, हसतात आणि विचारही करतात. कारण भारुडात माणसातील माणूसपण दडलेलं आहे. भारूड म्हणजे लोकसाहित्याच्या विशाल दालनातील एक जिवंत झरा आहे असं मला वाटतं. कारण यामध्ये आनंद देण्याची क्षमता आहे, विकारावर चिमटे घेण्याची ताकद आहे, मानवी आयुष्यातील फोलपणा आहे, करुणा व्यथा वेदना आहे, स्त्रियांचे दुःख आहे आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध केलेले परखड भाष्य आहे आणि शहाणपणही आहे. सर्वसामान्यांच्या मनावर गारुड करणारे हे भारूड जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. कारण यामुळेच आपली संस्कृती आपली संस्कार आपली भाषा टिकून आहे.

Comments
Add Comment