Sunday, January 25, 2026

शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा

शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांना संपूर्ण भारतात “हिंद द चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे ते सर्वोच्च रक्षक होते. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्ताने ‘हिंद द चादर’ अंतर्गत नांदेड येथे काल आणि आज मोठा समारोह होतो आहे. त्यानिमित्त शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा सांगणारा हा लेख -

धराव्या शतकाचा काळ हा भारतवर्षासाठी अत्यंत कठीण होता. वायव्येकडून येणारी इस्लामी आक्रमणे राज्य काबीज करत होती आणि इथल्या श्रद्धा आणि संस्कृतीचाही विध्वंस करत होती. अशा धामधुमीच्या काळात, जे)व्हा सर्वसामान्य माणूस भयाखाली जगत होता, तेव्हा पंजाबच्या मातीतून गुरू नानक देवजींच्या रूपाने स्वाभिमानाचा एक नवा हुंकार उमटला. त्यांनी दिलेला विचार हा असा आध्यात्मिक मार्ग होता ज्याने परकीय सत्तेच्या कट्टरतेला एक वैचारिक आणि कृतिशील आव्हान दिले. इथूनच दहा गुरूंच्या कार्याचा तो प्रवास सुरू झाला, ज्याने मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत एक ज्वलंत इतिहास निर्माण केला.

गुरू नानक देव (१४६९-१५३९) शीख धर्माचे प्रवर्तक गुरू नानक देवजी यांचा काळ हा बाबराच्या आक्रमणांचा काळ होता. परकीय आक्रमक जेव्हा इथल्या मंदिरांचा आणि संस्कृतीचा विध्वंस करत होते, तेव्हा नानकजींनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ईश्वराला ‘अकाल पुरख’ (काळाच्या पलीकडे असलेला) संबोधून त्यांनी स्पष्ट केले की, मानवी सत्ता ही क्षणभंगुर आहे आणि केवळ सत्यच शाश्वत आहे. त्यांनी विखुरलेल्या समाजाला ‘नाम जपो’, ‘किरत करो’ आणि ‘वंड चखो’ ही त्रिसूत्री देऊन पुन्हा संघटित केले. त्यांच्या मक्का-मदिनापासून हिमालयापर्यंतच्या यात्रा अर्थात उदासिया या केवळ धार्मिक नव्हत्या, तर त्या परकीय विचारसरणीच्या कट्टरतेला दिलेले एक प्रखर वैचारिक आव्हान होते.

गुरू अंगद देव (१५०४-१५५२) परकीय आक्रमणांमुळे इथल्या स्थानिक भाषा आणि लिपींवर मोठे संकट आले होते. अशा वेळी गुरू अंगद देवजींनी ‘गुरुमुखी’ लिपीला प्रोत्साहन देऊन आपली स्वतंत्र ओळख टिकवून धरली. आक्रमकांच्या वाढत्या दहशतीला आणि जुलुमाला तोंड देण्यासाठी केवळ शांत राहून चालणार नाही, हे ओळखून त्यांनी ‘मल्ल आखाडे’ सुरू केले. तरुणांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे, हे इस्लामी कट्टरतेच्या काळात स्वधर्माच्या रक्षणासाठी उचललेले पहिले क्रांतिकारी पाऊल होते.

गुरू अमर दास (१४७९-१५७४) इस्लामी कट्टरता जेव्हा समाजात फूट पाडत होती, तेव्हा गुरू अमर दासजींनी सामाजिक एकतेचे कवच उभे केले. “पहिले पंगत, पाठी संगत” अर्थात “प्रथम सर्वांसोबत पंगतीत बसून भोजन करा आणि त्यानंतरच गुरूंची भेट घ्या” हा नियम लावून त्यांनी समाजातील सर्व भेद मोडून काढले, जेणेकरून समाज आक्रमकांविरुद्ध एकसंध राहू शकेल. त्यांनी २२ ‘मंजी’ (प्रचार केंद्रे) स्थापन करून एक भक्कम संघटनात्मक जाळे विणले.

गुरू राम दास (१५३४-१५८१) चौथ्या गुरू राम दासजींनी अमृतसर शहराची आणि ‘अमृत सरोवर’ या जलाशयाची निर्मिती केली. त्यांनी अमृतसर या पवित्र शहराची निर्मिती करून शिख परंपरेला एक जागतिक ओळख मिळवून दिली. हे धार्मिक शहर एका नव्या आत्मबळाचे उगमस्थान झाले. परकीय संस्कृतीच्या प्रभावापासून अलिप्त राहून स्वतःची स्वतंत्र ओळख जपण्यासाठी त्यांनी विवाहासाठी ‘लावा’ या पवित्र फेऱ्यांची रचना केली. त्यांनी सुरू केलेली ‘मसांद’ व्यवस्था ही समाजातील गरजूंच्या मदतीसाठी आणि संघर्षासाठी लागणारी रसद उभी करण्याचे एक पारदर्शक साधन बनली.

गुरू अर्जन देव (१५६३-१६०६) पाचवे गुरू अर्जन देवजी यांचा काळ हा शीख परंपरेतील संघर्षाचा सर्वोच्च बिंदू ठरला. मुघल सम्राट जहांगीरच्या धार्मिक कट्टरतेच्या धोरणामुळे शिखांचे वाढते सामर्थ्य त्याच्या डोळ्यांत खूपत होते. गुरुजींनी ‘आदी ग्रंथा’चे संकलन करून एका महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले, ज्यात महाराष्ट्राचे संत नामदेव, कबीर आणि रविदास यांच्या वाणीचा समावेश होता. जहांगीरने जेव्हा गुरुजींवर इस्लामी धर्मांतराचा दबाव आणला, तेव्हा त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. परिणामी, त्यांना तप्त लोखंडी तव्यावर बसवून अमानुष छळ करून शहीद करण्यात आले. हे शीख इतिहासातील परकीय सत्तेविरुद्ध दिलेले पहिले सर्वोच्च बलिदान ठरले, ज्याने भक्तीच्या प्रवाहात शौर्याचे रक्त मिसळले. गुरू अर्जन देवजींच्या बलिदानाने भारतीय इतिहासाला एक अभूतपूर्व वळण दिले. केवळ शांतता आणि आध्यात्मिक उपदेशांनी परकीय आक्रमकांचे हृदयपरिवर्तन होणार नाही, तर आता ‘शस्त्राने शास्त्र’ वाचवण्याची वेळ आली आहे, हे शीख परंपरेने ओळखले. भक्तीच्या प्रवाहातून आता शौर्याची तलवार तळपू लागली होती.

गुरू हरगोविंद सिंग (१५९५-१६४४) पाचव्या गुरूंच्या शहादतीनंतर गुरू हरगोविंद सिंगजी यांनी शीख धर्माला एक नवे सामर्थ्य दिले. त्यांनी गादीवर बसताना दोन तलवारी धारण केल्या, एक ‘मीरी’ (राजकीय व ऐहिक सत्ता) आणि दुसरी ‘पिरी’ (आध्यात्मिक अधिकार). यातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला की, संत असणे म्हणजे दुबळे होणे नव्हे. त्यांनी अमृतसरमध्ये ‘अकाल तख्त’ स्थापन केले, जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे सर्वोच्च केंद्र बनले. मुघल सत्तेच्या अत्याचारांना आव्हान देत त्यांनी शिखांचे एक शिस्तबद्ध सैन्य उभे केले आणि अनेक लढायांमध्ये परकीय आक्रमकांचा पराभव करून भारतीय शौर्याचा दबदबा निर्माण केला.

गुरू हर राय (१६३०-१६६१) सहाव्या गुरूंनी निर्माण केलेली लष्करी शक्ती सातवे गुरू हर रायजी यांनी अधिक सुव्यवस्थित केली. मुघल राजपुत्र दारा शुकोह याने जेव्हा मुघल सत्तेच्या अंतर्गत संघर्षात आश्रय मागितला, तेव्हा त्यांनी त्याला मदत केली, जे मुघल कट्टरतेच्या विरोधात उभे राहण्याचे एक धाडसी पाऊल होते.

गुरू हरकिशन (१६५६-१६६४) गुरू हर राय जींच्या पश्चात त्यांचे कनिष्ठ सुपुत्र गुरू हरकिशनजी गुरुपदी आले. त्यांना ‘बाल गुरू’ म्हणून ओळखले जाते कारण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी ही जबादारी स्वीकारली. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान जेव्हा शहरात देवीची (Smallpox) मोठी साथ पसरली होती, तेव्हा त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणि याच सेवाकार्यात वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी देह ठेवला.

गुरू तेग बहादूर (१६२१-१६७५) मुघल सम्राट औरंगजेबाच्या सक्तीच्या धर्मांतराच्या धोरणामुळे जेव्हा काश्मिरी पंडितांवर संकट आले, तेव्हा नववे गुरू तेग बहादूरजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी दिलेले हे बलिदान अद्वितीय होते. दिल्लीच्या चांदीनी चौकात औरंगजेबाच्या कट्टरतेला न झुकता त्यांनी दिलेले बलिदान या मातीचा स्वाभिमान जागवणारे ठरले. म्हणूनच त्यांना अत्यंत गौरवाने ‘हिंद दी चादर’ अर्थात हिंदू धर्माचे रक्षक असे म्हटले जाते.

गुरू गोविंद सिंग (१६६६-१७०८) दहावे गुरू गोविंद सिंगजी हे शौर्य आणि कतृत्वाचे शिखर होते. १६९९ च्या वैशाखीदिनी त्यांनी ‘खालसा पंथ’ स्थापन करून एका अशा सशस्त्र दलाची निर्मिती केली, ज्याने मुघलांचे अस्तित्व संपवण्याची शपथ घेतली. त्यांनी ‘पंज प्यारे’ निवडून जातिभेद मुळापासून उपटून टाकला आणि सर्वांना ‘सिंग’ व ‘कौर’ ही आडनावे देऊन एक नवी ओळख दिली. त्यांनी शिखांसाठी पाच ‘ककार’ अर्थात केश, कंगा, कडा, कचेरा आणि किरपाण अनिवार्य केले. आपल्या चारही पुत्रांचे बलिदान धर्मासाठी देऊनही खचून न जाता ते आजीवन मुघलांशी लढत राहिले. त्यांनी औरंगजेबाला ‘झफरनामा’ लिहून त्याच्या अन्यायाची आणि नैतिक पराभवाची जाणीव करून दिली.

गुरू ग्रंथ साहिब : शब्दांचे चिरंतन अधिष्ठान गुरू गोविंद सिंगजींनी नांदेड येथे आपल्या आयुष्याचा अंतिम काळ व्यतीत केला. येथेच त्यांनी जाहीर केले की, यापुढे कोणताही देहधारी गुरू नसेल. त्यांनी ‘आदि ग्रंथा’ला ‘गुरू ग्रंथ साहिब’ म्हणून मान्यता दिली आणि त्यांना शिखांचे जिवंत आणि शाश्वत गुरू घोषित केले. हा ग्रंथ केवळ गुरूंची वाणी नाही, तर त्यात संत नामदेव, कबीर, रविदास अशा अनेक महान संतांच्या विचारांचा संगम आहे. हा पवित्र ग्रंथ आजही समता, सेवा आणि निर्भयतेचा मार्ग दाखवत आहे. गुरू नानक देवजींनी पेरलेले मानवतेचे बीज गुरू गोविंद सिंगजींच्या काळापर्यंत एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले होते, ज्याची सावली आजही संपूर्ण जगाला शांती आणि एकात्मतेचा संदेश देत आहे. परकीय आक्रमणे आणि कट्टरतेच्या काळात या गुरुपरंपरेने दिलेला लढा आजही भारताच्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे.

Comments
Add Comment