महापौर, उपमहापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात
विरार : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विविध राजकीय पक्षांची गट नोंदणी विभागीय आयुक्तांकडे होणे आवश्यक आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप सेना महायुतीने अद्याप पर्यंत आपल्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केलेली नाही. त्यामुळे येथील महापौर, उपमहापौराची निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच होण्याची शक्यता दिसून येत आहे.
वसई-विरार शहर पालिकेच्या ११५ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे ७० नगरसेवक निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्याने काँग्रेसचा एक उमेदवार देखील येथे विजयी झाला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीकडे एकूण सदस्य संख्या ही ७१ एवढी आहे. तर भारतीय जनता पक्षाचे ४३ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेची एक नगरसेविका विजयी झाली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व ११५ नगरसेवकांची नावे शासनाच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे वसई-विरार महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर देखील झाले आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून संबंधित सर्व माहिती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडी आणि महायुती या दोन्ही राजकीय पक्षांकडून अद्याप विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यात आलेली नाही.
बहुजन विकास आघाडीने आपला गटनेता निवडला असून महायुतीने अद्याप गटनेता देखील निवडलेला नाही. रविवार आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिन असल्यामुळे दोन्ही राजकीय पक्षाकडून २७ किंवा २८ जानेवारी रोजी विभागीय आयक्तांकडे गटाची नोंदणी केल्या जाण्याची शक्यता आहे.
या राजकीय पक्षाकडून गट नोंदणी झाल्यानंतरच विभागीय आयुक्तांकडून वसई विरार महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडण्यासाठी निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी नेमल्या जाणार आहेत. संबंधित अध्यासी अधिकारी यांच्याकडून महापालिका आयुक्तासोबत चर्चा झाल्यानंतर महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष बैठक बोलविण्यात येणार आहे. नवनिर्वाचित ११५ सदस्यांना या निवडणुकीसाठी विशेष नोटीस दिल्यानंतर किमान तीन ते जास्तीत जास्त सात दिवसांची वेळ दिल्या जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत येथील महापौर उपमहापौर निवडणूक होण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे वसई विरारचा प्रथम आणि द्वितीय नागरिक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निवडल्या जाण्याची शक्यता आहे.
'आप्पा'कडून सोशल इंजिनीअरिंग ?
महापौर, उपमहापौर, गटनेता, सभागृह नेता आणि स्थायी समिती सभापती यासह विविध विषय समित्यांचे सभापती अशी महत्त्वाची पदे महापालिकेत आहेत. यापैकी गटनेता म्हणून बहुजन विकास आघाडीने माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता उर्वरित महत्त्वाच्या पदांवर सर्वच समाजाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न बहुजन विकास आघाडी करून केल्या जाण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीत अजिव पाटील हे एक नाव सर्वच बाबतीत चर्चेत आहे. परिणामी एक मोठे पद अजिव पाटील यांना मिळण्याची चर्चा असून, उर्वरित पदांचे शिलेदार निवडताना माजी आमदार हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा यांच्याकडून सोशल इंजिनीअरिंगचा वापर केला जाणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
भाजपमध्ये अनुभवींना प्राधान्य
भाजप शिवसेना महायुती गटनेता तसेच विरोधी पक्ष नेता निवडताना पक्षातील अनुभवी चेहऱ्याला संधी देणार असल्याचे बोलल्या जात आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील या आक्रमक आणि अभ्यासू आहेत. मनोज पाटील हे देखील भाजपमधील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्याचप्रमाणे महेश सरवणकर, नारायण मांजरेकर, नीलेश चौधरी, अशोक शेळके, जयप्रकाश वझे किंवा एखाद्या नवीन चेहऱ्याला या दोन पैकी एका पदावर विराजमान होण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.






