कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्रास बॅण्ड महाअंतिम फेरीत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅण्ड पथकाने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण इतिहास रचला. पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत मैदानात उतरलेल्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, तालबद्ध वादन, अचूकता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत ५१ हजार रूपये रोख पारितोषिक, मानाचा चषक व सन्मानपत्र प्राप्त केले. या गौरवपूर्ण सोहळ्यात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते विजेत्या संघाचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, संगीत शिक्षक महेश गुरव, ब्रास बॅण्ड पथकाचे टीम लिडर कॅडेट विपुल वाघ यांच्यासह संपूर्ण संघाने सन्मान स्वीकारला.
पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना सेठ यांनी सांगितले की,“२०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका निर्णायक ठरणार असून, शालेय बँड पथके विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि देशभक्तीची जाणीव दृढ करतात.” या ऐतिहासिक यशामागे संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांचे दूरदृष्टी पूर्ण मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ मोलाचे ठरले. तसेच प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बॅण्ड प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच हे यश साकार झाले आहे. हे यश म्हणजे शिस्त, सातत्य, संघभावना आणि देशभक्तीच्या संस्कारांची फलश्रुती असून, स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेले “ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण व शिस्तबद्ध पिढी घडवण्याचे स्वप्न” प्रत्यक्षात साकार झाल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या या विजयामुळे कोपरगाव तालुका, अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राचा देशपातळीवर मान उंचावला असून, “शिस्त आणि सातत्याच्या बळावर स्वप्नांची उंची गाठता येते” हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.