माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता
विशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सचे आहे. आपली बहुतांशी कामे मानव आता यंत्रमानवाकडून करून घेऊ लागला आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय रेल्वेनेही आपल्या कामात यंत्रमानवाचा वापर करायला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मानवरूपी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात केला आहे.
भारतीय रेल्वेच्या पूर्व किनारपट्टी भागात प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी ‘एएससी अर्जुन’ हा मानवरूपी (ह्युमनॉइड) यंत्रमानव कार्यान्वित करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिपत्याखाली हा यंत्रमानव तैनात करण्यात आला आहे. आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तन मोहिमेचा तो एक भाग आहे. यामागील उद्देश सुरक्षा यंत्रणा बळकट करणे आणि प्रवाशांना अधिक प्रभावी सहाय्य देणे हा आहे.
‘प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर हा मानवरूपी रोबोट तैनात करून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे ‘आरपीएफ’चे महानिरीक्षक आलोक बोहरा यांनी सांगितले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ललित बोहरा यांनी सांगितले की, हा यंत्रमानव प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताने सुसज्ज आहे. त्यामुळे तो ‘आरपीएफ’ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांसाठीही एक स्मार्ट सहाय्यक म्हणून काम करतो.
प्रवाशांशी साधणार संवाद
या यंत्रमानवाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये चेहरा ओळख प्रणालीद्वारे घुसखोरी शोधणे, एआय-आधारित गर्दी घनता विश्लेषण, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये बहुभाषिक सार्वजनिक घोषणा, तसेच अडथळे टाळत अर्धस्वायत्त पद्धतीने प्लॅटफॉर्मवर गस्त घालण्याची क्षमता यांचा समावेश आहे. याशिवाय, एकात्मिक डॅशबोर्डच्या माध्यमातून रिअल-टाइम परिस्थितीची जाणीव, आग व धूर ओळखून तत्काळ इशारे देणे, तसेच मैत्रीपूर्ण हालचाली आणि माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमताही या यंत्रमानवात आहे.






