अयोध्या : अयोध्येतून एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक धार्मिक उपक्रम सुरू झाला असून, राम मंदिराच्या शिखरावर फडकवला जाणारा पवित्र धर्मध्वज आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. सनातन संस्कृतीचा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचावा, या संकल्पनेतून रामध्वज यात्रा सुरू करण्यात आली असून हा ध्वज पृथ्वीवरील सातही खंडांवर फडकवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात वैदिक मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि भक्तीमय वातावरणात या यात्रेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात संत, साधू आणि असंख्य रामभक्त उपस्थित होते. राम मंदिराच्या शिखरावर प्रतिष्ठापित होणारा हाच पवित्र ध्वज आता केवळ अयोध्येचे प्रतीक न राहता, सनातन धर्माची जागतिक ओळख बनणार आहे. या मोहिमेमुळे ही यात्रा केवळ धार्मिक उपक्रम न राहता एक व्यापक सांस्कृतिक चळवळ ठरत आहे.






